मुस्लिम या देशात भाडेकरू नाहीत, भागीदार आहेत- ओवैसी

    दिनांक :01-Jun-2019
हैदराबाद,
मुस्लिम बांधवांनी भाजपाला घाबरू नये. या देशात आम्ही भाडेकरू नाही तर समसमान भागीदार आहोत. हिंदूंइतकाच आमचाही या देशावर अधिकार आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आम्हाला संविधानाने दिला आहे अशा शब्दात केंद्रातील भाजपा सरकारवर एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दिन ओवैसींनी निशाणा साधला आहे. हैदराबाद येथे मक्का मशिदीत एका जनसभेला ते संबोधित करत होते.
 
 
सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ३०० हून अधिक जागा घेत भाजपा विजयी झाल्यानंतर दोनच दिवसांत दिल्लीजवळील गुरुग्राम येथे एका मुस्लिम बांधवावर हल्ला करण्यात आला. अशा घटना देशातील इतर भागांमध्ये गेल्या पाच वर्षांत अनेकदा घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारवर असदुद्दिन ओवैसी यांनी सडकून टीका केली. 'मोदींना जर असं वाटत असेल की ३०० हून अधिक जागा मिळाल्यामुळे ते देशावर मनमानी करू शकतील तर तसं होणार नाही.
 
भाजपाला घाबरण्याची मुसलमानांना काहीच गरज नाही. आम्ही या देशात काही मारेकरी म्हणून राहत नाही. तर या देशात भागीदार आहोत. जर मोदी मंदिरांमध्ये जाऊ शकत असतील तर मुसलमानही मशिदीत जाऊ शकतात. तो आमचा संविधानिक अधिकार आहे.' अल्पसंख्यांक धोक्यात येतील तेव्हा संविधानाच्या आधारे मुस्लिम बांधवांसाठी मी लढीन असा विश्वासही ओवैसींनी व्यक्त केला.