न्यूझीलंडचा श्रीलंकेवर एकतर्फी विजय

    दिनांक :01-Jun-2019
- आयसीसी विश्वचषक क्रिकेट
- मार्टिन गप्टिलच्या नाबाद 73 धावा
- सामनावीर मॅट हेनरी
कार्डिफ,
गोलंदाजी व त्यानंतर फलंदाजीचे जबरदस्त प्रदर्शन करत केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने श्रीलंकेवर 10 गड्यांनी एकतर्फी मात करून आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपली दमदार विजयी सुरुवात केली.
 
 
 
प्रभावी मार्‍याच्या बळावर श्रीलंकेला 29.2 षटकात 136 धावात गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 137 धावांचे लक्ष्य एकही गडी न गमावता सहज गाठले. सलामी फलंदाज मार्टिन गप्टील व कॉलिन मुनरोने नाबाद अर्धशतक झळकावत संघाचा विजय साकार केला.
 
मार्टीन गप्टीलने 51 चेंडूत 8 चौकार व 2 षट्‌कारांसह नाबाद 73 धावांची, तर कॉलिन मुनरोने 47 चेंडूत 6 चौकार व एका षट्‌कारसह नाबाद 58 धावांची खेळी केली. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडची ही सलामी जोडी फोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु न्यूझीलंडचा विजय साकार होईस्तोवर त्यांना यश मिळाले नाही.
तत्पूर्वी, लॉकी फर्ग्युसन-मॅट हेनरी व अन्य गोलंदाजांनी प्रभावी मारा करत श्रीलंकेला 136 धावात गुंडाळणण्यात यश मिळवले.
 
नाणेफेक िंजकून सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. मॅट हेनरीने प्रारंभीच श्रीलंकेला तीन जबरदस्त हादरे दिले. श्रीलंकेकडून कर्णधार दिमुथ करुणरत्ने, कुशल आणि थिसारा पेरेरा यांनी थोडीफार झुंज दिली. इतर फलंदाज न्यूझीलंडच्या अचूक मार्‍यासमोर तग धरू शकले नाही.
कर्णधार करुणारत्ने 52 धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून मॅट हेनरी व लॉकी फर्ग्युसनने प्रत्येकी 3 बळी टिपण्याची किमया केली. ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रॅण्डहोम, जेम्स निशाम, मिशेल सॅण्टनरने 1 बळी टिपला.