5 जूननंतर अमेरिका भारताला व्यापारात कोणतीही सूट देणार नाही

    दिनांक :01-Jun-2019
- ट्रम्प सरकारचा नवा निर्णय
वॉशिंग्टन,
अमेरिकेकडून भारताला व्यापारासाठी दिलेली प्रोत्साहन योजना 5 जूनपासून बंद करण्यात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने भारताला जीएसपी (जनरलाईझ्ड सिस्टिम ऑफ प्रेफरन्स) दर्जा दिला होता. हा दर्जा आता हटवण्यात येणार आहे.
 
 
 
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत म्हटले आहे की, भारताने अमेरिकन उत्पादनांना भारतीय बाजारपेठांमध्ये समान संधी देण्याचे आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी मार्चमध्ये टर्की आणि भारताचा जीएसपी दर्जा काढून टाकणार असल्याचे सांगितले होते. त्याची आता अंमलबजावणी केली जाणार आहे. अमेरिकेचे म्हणणे आहे की, भारतातील विविध प्रतिबंधांमुळे त्यांचे व्यावसायिक नुकसान होत आहे. आमच्या वस्तूंना समान दर्जा दिला जात नसल्यामुळे व्यापारावर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. तसेच, भारत जीएसपीचे मापदंड पूर्ण करण्यात अयशस्वी ठरला आहे.
 
दरम्यान, अमेरिकन कॉंग्रेसच्या 24 सदस्यीय समितीने प्रशासनाला 3 मे रोजी एक पत्र पाठवले होते. यामध्ये भारताचा जीएसपी दर्जा काढून घेण्याची विनंती करण्यात आली होती. यानुसार, भारताकडून निर्यात केल्या जाणार्‍या मालाला अमेरिकेने आता करसवलती देण्याचे नाकारले असून, भारताच्या मालावर आता ते मोठ्या प्रमाणात कर लागू करणार आहेत.
 
जीएसपी कार्यक्रमाअंतर्गत समाविष्ट विकसनशील देशांना अमेरिकेमध्ये निर्यात शुल्कातून सूट मिळते. यानुसार भारत सुमारे दोन हजार उत्पादने अमेरिकेला निर्यात करतो. यामध्ये वाहन उद्योगाशी संबंधित सुटे भाग आणि वस्त्रोेद्योगाशी संबंधित उत्पादने यांचा प्रामुख्याने समावेश आहे. 2017 मध्ये भारत जीएसपी योजनेचा सर्वात मोठा लाभार्थी ठरला होता. या योजनेचा लाभ घेऊन भारताने 5.7 अब्ज डॉलर्स इतक्या किमतीचा माल अमेरिकेला निर्यात केला होता.