अमेरिकेत माथेफिरूचा अंदाधुंद गोळीबार, 12 जणांचा मृत्यू

    दिनांक :01-Jun-2019
- हल्लेखोराचा खात्मा
वॉशिंग्टन,
अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये एका सरकारी कार्यालयातील माथेफिरू कर्मचार्‍याने आपल्या सहकार्‍यांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 12 जण ठार झाले आहेत. या गोळीबारात सहा जण जखमी झाले आहेत. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हल्लेखोरही ठार झाला आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. स्थानिक वेळेनुसार, शुक्रवारी सायंकाळी चार वाजता ही घटना घडली. हल्लेखोर कर्मचारी अचानक सरकारी कार्यालयात घुसला आणि त्याने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली.
 
 
 
हे कार्यालय बहुमजली असून, प्रत्येक मजल्यावर मृतदेह आढळून आले आहेत. जखमींमध्ये एका पोलिस कर्मचार्‍याचाही समावेश आहे. बुलेटप्रूफ जॅकेट घातल्याने तो बचावला, अशी माहिती पोलिस प्रमुख जेम्स सेरव्हेरा यांनी दिली. या घटनेनंतर आम्ही शेजारच्या इमारतीही रिकाम्या केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. गोळीबार करणारा माथेफिरू व्हर्जिनिया येथील म्युनिसिपल सेंटरचा कर्मचारी आहे. मात्र, हा कर्मचारी नेमका कोण होता? त्याचे नाव काय होते, हे अद्याप पोलिसांनी जाहीर केलेले नाही. आरोपीने या ठिकाणी गोळीबार का केला आणि या लोकांचा जीव का घेतला, त्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
 
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. घटनास्थळी एफबीआयचे अधिकारी पोहचले असून, त्यांच्यातर्फे चौकशी सुरू करण्यात आली आहे. आमच्यासाठी हा एक दुःखद आणि वेदनादायी दिवस आहे, अशी प्रतिक्रिया व्हर्जिनियाचे महापौर बॉबी डायर यांनी वृत्तसंस्थेसोबत बोलताना व्यक्त केली. एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत अशा प्रकारच्या गोळीबाराची ही 150वी घटना आहे. याआधी अनेकदा झालेल्या घटनांमध्ये काही ना काही तणावात असलेल्या लोकांनी नागरिकांवर गोळीबार केला आहे. काही घटनांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांवरही गोळीबार झाला आहे.