हरसिमरत कौर बादल सर्वात श्रीमंत मंत्री

    दिनांक :01-Jun-2019
- 217 कोटींची संपत्ती
- प्रताप सारंगी सर्वात गरीब मंत्री
नवी दिल्ली,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील 56 मंत्र्यांपैकी 51 मंत्री हे कोट्यधीश आहेत. यातील 22 जणांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने दिली आहे. या संस्थेने सदर अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार, हरसिमरत कौर बादल या सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. ओडिशाचे प्रताप सारंगी सर्वात गरीब मंत्री ठरले आहेत. असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्सनुसार, त्यांच्याकडे 13 लाखांची संपत्ती आहे.
 
 
 
हरसिमरत कौर बादल यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची एकूण संपत्ती 217 कोटी रुपये आहे. हरसिमरत कौर यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या खात्यात 41 लाख रुपये जमा आहेत. तसेच, 60 लाख रुपयांचे विविध समभाग व रोखे आहेत. याशिवाय 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जही त्यांच्या नावावर आहे. त्यांंच्या नावावर 49 कोटी रुपयांची संपत्ती आहे. हरसिमरत कौर या फॅशन डिझायनरही आहेत. हरसिमरत कौर या पंजाबमधील भिंटडा मतदारसंघातून सलग तिसर्‍यांदा विजयी झाल्या आहेत. पंतप्रधान मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळातही त्यांच्याकडे अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचीच जबाबदारी होती.
 
पीयूष गोयल हे दुसरे सर्वात श्रीमंत मंत्री असून, त्यांच्याकडे एकूण 95 कोटी रुपयांची संपत्ती आहे. या दोघांनंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा क्रमांक लागतो. त्यांच्याकडे 40 कोटींची संपत्ती आहे. या कोट्यधीशांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी 46व्या क्रमांकांवर आहेत. त्यांच्याकडे दोन कोटींची संपत्ती आहे.