कॉंग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी....

    दिनांक :01-Jun-2019
चौफेर  
 
सुनील कुहीकर  
 
 
आजपासून 134 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या कॉंग्रेस नामक एका बलाढ्य राजकीय पक्षाची गेल्या काही वर्षांत झालेली वाताहत आणि त्यानंतर त्यास सावरण्याचे सुरू झालेले प्रयत्न, भारतीय राजकीय वर्तुळात दखलपात्र ठरावेत असेच आहेत. लोकशाहीव्यवस्थेत सत्ताधार्‍यांसोबतच विरोधी पक्षाचे महत्त्वही तेवढेच आहे. िंकबहुना सत्ताधार्‍यांवर अंकुश ठेवण्याइतका विरोधी पक्ष बलाढ्य असावा, अशीच अपेक्षा आहे. सत्तेची सूत्रं ‘आपल्या’ हातात असावीत असे वाटणे आणि त्यादृष्टीने प्रयत्न करणे, राजकारणाच्या सारिपाटावरचे जमेल तेवढे सारे डाव खेळणे, हा प्रत्येकाचाच अधिकार. जनतेने बजावलेल्या मताधिकारातून स्पष्ट झालेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आपापल्या भूमिका स्वीकारणे, हेही सर्वांचेच कर्तव्य. पण, स्वत:ची रेष मोठी करण्यापेक्षा इतरांच्या रेषा पुसण्यासाठी चाललेली धडपड, हे यंदाच्या निवडणूक प्रचारतंत्रातील सर्वात दुर्दैवी वास्तव होते. प्रचाराचा स्तरही नको तितका घसरलेला पाहिला जनतेने यंदा. आता पंतप्रधानांच्या शपथविधीनंतर नवे सरकार त्याचे कार्य आरंभ करेल. त्याच वेळी, यावेळीही विरोधी पक्षनेतेपद वाट्याला येऊ न शकलेला कॉंग्रेस पक्ष, त्याच्या पुनरुज्जीवनासाठी कार्यप्रवण झालेला असेल...
 
 
 
खरंतर या पक्षाच्या नेत्यांनी त्या दृष्टीने काम सुरूही केलेले दिसते आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद गांधी घराण्यातून बाहेर काढण्यापासून तर पक्षातील वयोवृद्धांना घरी बसवण्यापर्यंतचे सारे धाडसी निर्णय, ही त्याचीच साक्ष आहे. या देशात ‘गांधी’ नावाची एक जादू आहे. आजही जनमानसावर त्याचा प्रभाव आहे. कमालीची स्वीकारार्हता लाभली आहे त्या नावाला. अर्थात, ती जादू सर्वस्वी ‘त्या’ महात्म्याच्या नावाशी जोडली गेली आहे. एरवी कुठल्याच अर्थी ‘गांधी’ नसलेले फिरोज यांच्याशी लग्न झाल्यानंतर इंदिरा यांना हे आडनाव स्वीकारावेसेे वाटणे आणि रॉबर्ट वॉड्रा यांच्याशी लग्न झाल्यानंतरही प्रियांकाने त्याच आडनावाने स्वत:ची ओळख कायम ठेवणे... ‘गांधी’ नावाची जादू एन्कॅश करण्यापलीकडे दुसरा कुठलाही उद्देश यातून प्रतिध्वनित होत नाही, हेच खरे! हेही तितकेच खरे आहे की, या देशातील लोक वर्षानुवर्षे गुलामगिरीच्या गर्तेत वावरले आहेत. त्याचा स्वाभाविक परिणाम त्यांच्या मानसिकतेवर झाला आहे. कायम प्रजेच्या भूमिकेत जगणार्‍या या जनतेला तिच्यावर राज्य करणारा एक ‘राजा’ लागतो. आर्थिक वा राजकीय क्षेत्रातील अशा बड्या घराण्यातील लोकांपुढे माना तुकविण्याची तर्‍हा, हा त्याचाच परिणाम आहे. याच जनमानसाचा ‘वापर’ करून घेत स्वत:ची प्रतिमा साकारण्याचा आणि त्या माध्यमातून सत्तासूत्रे स्वत:कडे कायम ठेवण्याचा प्रयत्न आजवर या पक्षातील धुरीणांनी केला. लोकभावनांच्या परिणामस्वरूप त्याला काहीअंशी यशही लाभत गेले. पण, केवळ त्याच्याच भरवशावर घराण्याची सत्ता वर्षानुवर्षे टिकून राहू शकत नाही, हे लक्षात घेण्याची गरज सत्तेच्या मगरुरीत नजरेआड झाली अन्‌ आता ‘ही’ परिस्थिती उद्भवली. सत्तर वर्षे देशाची सत्ता सांभाळलेल्या कॉंग्रेसच्या हाती विरोधी पक्षनेतेपदही वाट्याला येऊ नये, अशी अवस्था आज निर्माण झाली आहे. कालपर्यंत कॉंग्रेस हे देशाचा स्वातंत्र्यलढा लढणारे संघटन होते. स्वाभाविकपणे त्याच भावनेतून लोकशक्ती भक्कमपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली होती. पण, हळूहळू काळ मागे पडत गेला. लोक शिकले. विचार करू लागले. योग्यायोग्यता ठरवू लागले. निर्णय घेऊ लागले. नेहरू-गांधी म्हणजे राजघराणे आणि इतर लोक म्हणजे गरीब बिचारी प्रजा... हा मानस बदलू लागला. त्याचा परिणाम हा आहे की, राहुल गांधींना त्यांच्या हक्काच्या अमेठीत पराभव बघावा लागला. कधीकाळी राजघराण्याच्या जनमानसातील प्रभावाच्या पार्श्वभूमीवर अटलबिहारी वाजपेयी यांचा पराभव करणार्‍या माधवराव सिंधीयानच्या चिरंजीवांनाही यंदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ज्यांच्याकडून मर्यादेपलीकडे अपेक्षा होत्या, त्या प्रियांकाही कुठलाच चमत्कार सिद्ध करू शकल्या नाहीत. या पृष्ठभूमीवर कॉंग्रेसाध्यक्षपद ‘गांधी’ घराण्याच्या बाहेर काढण्याचा दस्तुरखुद्द राहुल यांचा प्रस्ताव म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. तो केवळ विरोधकांनी केलेल्या धारदार टीकेचा परिणाम नाही. पक्षाची धुरा सांभाळणार्‍यांना एव्हाना लोकभावना ध्यानात आली असल्याचे ते संकेत आहेत. ‘गांधी’ आडनावाशी काडीचा संबंध नसताना, कालपर्यंत त्याचा जेवढा ‘लाभ’ मिळायचा तो मिळाला. मात्र, यापुढे फक्त त्याच्या भरवशावर राजकारण करता यावयाचे नाही, ही बाब खुद्द सोनिया, राहुल यांनाही ध्यानात आली असल्याचे त्यातून स्पष्ट होते, ते वेगळेच.
सलग पदरी पडत असलेल्या पराभवातून धडा घेण्याचा आणि सकारात्मक पावलं टाकत त्यातून सावरण्याचा ध्यास म्हणूनच महत्त्वाचा. येता काहीकाळ माध्यमांपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा निर्णय असो, की पक्षातील वयोवृद्धांना ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ असे म्हणणार्‍यांच्या पंक्तीत नेऊन बसविण्याची योजना, कात टाकण्याच्या दिशेने या पक्षाने प्रवास सुरू केला असल्याचेच ते द्योतक आहे. कधीकाळी पंधरा-पंधरा, वीस-वीस पक्षांनी एकत्र येऊन कडबोळे तयार करायचे अन्‌ मग त्यांनी केंद्रात सत्ता स्थापन करण्याची, नंतर छोट्या छोट्या राजकीय पक्षांनी आठ-दहा सदस्यांचा पाठिंबा देण्याची ‘किंमत’ पुरेपूर वसूल करण्याची तर्‍हा बाजूला पडून भारतीय राजकारण हळूहळू द्विपक्षीय, निदान दोन प्रमुख राजकीय गटांच्या राजकारणाकडे प्रवाहित होत असताना, त्यातील एका गटाने मर्यादेपलीकडे कमकुवत होणे, कदाचित लोकशाहीला पूरक ठरणार नाही. शिवाय, भविष्यात केव्हातरी सत्ता परत मिळविण्याची ईर्ष्याही असणारच आहे कॉंग्रेसच्या अध्वर्यूंची. गेल्या दशकभराच्या कालावधीत जो प्रभाव नरेंद्र मोदींना निर्माण करता आला, तो केवळ समाजमाध्यमांवरील प्रतिमेचा परिणाम नाही. ग्राऊंडलेव्हलवर केलेल्या प्रत्यक्ष कामातून हे चित्र साकारले आहे. नरेंद्र मोदींच्या कामाचा झपाटा, त्यांची ऊर्जा, कामाचा वेग, वागण्याची पद्धत, पेहराव... याचा एकत्रित प्रभाव लोकांवर आहे. भारतीय तरुणांमध्ये त्या व्यक्तिमत्त्वाचे प्रचंड आकर्षण आहे. त्यांना ट्विटरवर फॉलो करणार्‍या युवकांची संख्या भली मोठी आहे. त्यांनी दिलेल्या पकोड्याच्या व्यवसायाच्या कल्पनेची खिल्ली उडवून राजकारण करण्याची तर्‍हा भलेही अनुसरली असेल विरोधकांनी, पण तरुणांना त्यात काहीच वावगे आढळलेले नाही. प्रत्येकाने प्रत्यक्षात पकोडेच तळले पाहिजे असे नाही, पण नोकर्‍यांच्या मागे न लागता स्वबळावर उभे राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र प्रत्येकाने केला पाहिजे, एवढा अपेक्षित बोध तरुणाईने त्यातून स्वीकारला आहे. युवामनाचा हा आधुनिक युगातील झंकार बहुधा कळलाच नाही कॉंग्रेसच्या नेत्यांना. तरुणाईच्या मनात हा विश्वास निर्माण करण्यात, स्वत:ची वेगळी अशी प्रतिमा निर्माण करण्यात पंतप्रधानांना यश येत असताना, कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची मात्र ‘पप्पू’च्या स्वरूपातील प्रतिमा लोकांच्या मनात घर करून बसली आहे. अर्थात, ते स्वत:च त्यासाठी कारणीभूत ठरलेत. अनेकदा त्यांनी स्वत:च स्वत:चे हसे करून घेतले. निदान या स्तरावरील नेत्यांनी तरी चौकटीबाहेरचे राजकारण करणे जनतेला अपेक्षित आहे, एवढा धडा या पराभवातून घेता आला कॉंग्रेसला, तरी पुरे आहे.
आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद गांधी घराण्याच्या आवाराबाहेर काढण्याचा धाडसी निर्णय घेतला आहेच, तर त्यावर ठाम राहण्याचा आणि त्या निर्णयाला जागण्याचाही निर्णय त्या घराण्याने घ्यावा. नाहीतर सीताराम केसरींपासून तर पी. व्ही. नरिंसह रावांपर्यंतच्या, गांधी घराण्याबाहेरील नेत्यांना मिळालेल्या हीन दर्जाच्या वागणुकीचे दाखले कमी नाहीत इतिहासात. आपल्याला न जुमानणार्‍यांना, संधी गवसली की ठेचून काढण्याच्या इंदिराजींच्या राजकीय शैलीचाही साक्षीदार राहिलाय्‌ हा देश. ‘पंतप्रधान’ असलेल्या डॉ. मनमोहनिंसगांपुढे स्वत:ला श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठीची सोनियांची धडपडही विसरलेले नाही इथे कुणीच. अशा स्थितीत केवळ तोंडदेखलेपणा म्हणून नव्हे, तर खरोखरीच ‘गांधीं’शिवायही कुणाच्यातरी हातात पक्षाची सूत्रे सोपवून संघटकाच्या भूमिकेत यावे या घराण्याने. इतकी वर्षे सत्ता उपभोगली. आता संघटनबांधणीतून पक्ष नव्याने उभा करण्यासाठी त्यागाच्याही मार्गाने जावे श्रेष्ठींनी. बघू या! त्या प्रयोगातून तरी हा पक्ष नव्या उमेदीने ताठपणे उभा राहतो की, अपेक्षा सोडून द्यावी इतपत अवकळा वाट्याला येते त्याच्या...
9881717833