तालिबानसोबतची मॉस्को येथील चर्चा निष्फळ

    दिनांक :01-Jun-2019
मॉस्को,
अफगाणिस्तानमधील हिंसाचार संपवण्याच्या उद्देशाने अफगाणिस्तान सरकार आणि तालिबानी नेत्यांमध्ये मॉस्को येथे झालेली शंतता चर्चा कोणत्याही ठोस निष्कर्षाशिवाय संपली आहे. अफगाण सरकारने चर्चेची चांगली सुरुवात केली होती. मात्र, सर्व मुद्यांवर सहमती झाली नसल्याचे तालिबानी नेत्यांनी सांगितले. ही शांतता प्रक्रिया पुढेही सुरू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा चर्चेची आवश्यकता आहे, असेही तालिबानने म्हटले आहे.
 

 
 
अफगाणिस्तान आणि तालिबानच्या या चर्चेसाठी रशियाने पुढाकार घेतला होता. मुल्ला बरादर अखुंद याच्या नेतृत्वाखाली तालिबानी नेत्यांचे शिष्टमंडळ अफगाण सरकारच्या नेत्यांना भेटले. अफगाण नेत्यांच्या शिष्टमंडळामध्ये स्थानिक नेते आणि यावर्षी होणार्‍या अध्यक्षीय निवडणुकांमधील संभाव्य उमेदवारही सहभागी झाले होते. अफगाणिस्तानमध्ये सध्या असलेल्या आंतरराष्ट्रीय फौजा ताबडतोब निघून गेल्या पाहिजेत, अशी प्रमुख अट तालिबानी नेत्यांकडून समोर ठेवली गेली होती. विदेशी फौजांच्या उपस्थितीमुळेच शांतता प्रक्रियेमध्ये अडथळा येत असून, जोपर्यंत या फौजा निघून जात नाहीत, तोपर्यंत युद्धबंदी जाहीर केली जाऊ शकत नसल्याचे तालिबानी नेते म्हणाले. 2001 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतली होती.