अमेरिकेने भारताचा ‘जीएसपी’ दर्जा काढला

    दिनांक :01-Jun-2019
अमेरिकेने भारताला मिळालेला व्यापार अग्रक्रम दर्जा (जनरलाइज्ड सिस्टीम ऑफ प्रेफरन्स) अर्थात जीएसपी दर्जा काढला असुन, याची अंमलबजावणी ५ जून पासून होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाउसमध्ये ही घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी या अगोदर ४ मार्च रोजीच हे स्पष्ट केले होते की, ते भारताचा जीएसपी दर्जा काढणार आहेत. यानंतर देण्यात आलेला ६० दिवसांचा नोटीस कालावधी ३ मे रोजी संपला होता. त्यामुळे आता यासंबंधी कधीपण औपचारीक अधिसूचना जारी होऊ शकते. या प्रकरणी भारत सरकारच्यावतीने पहिली प्रतिक्रिया देताना सांगण्या आले की, या प्रश्नी तोडगा काढण्याबाबत अमेरिकेसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता, मात्र त्यांना तो मान्य झाला नाही.
 
 
अमेरिकेने घेतलेल्या या निर्णयानंतर वाणिज्य मंत्रालयाने एक पत्रक काढून म्हटले आहे की, भारताने अमेरिकेच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र दुर्देवाने तो अमेरिकेला मान्य झाला नाही. या पत्रकात उत्तर देताना म्हटले आहे की, अमेरिका किंवा अन्य कोणत्याही देशाप्रमाणे अशा प्रकरणात भारत राष्ट्र हितास प्राधान्य देईल. आम्हाला महत्त्वपूर्ण विकासाची आवश्यकता व चिंता आहे आणि आमचे लोक देखील एका चांगल्या जीवनशैलीची इच्छा ठेवतात. हे सरकारच्या दृष्टिने मार्गदर्शक असेल. सरकारद्वारे हे देखील सांगण्यात आले की, आर्थिक संबंधामध्ये अशाप्रकारच्या गोष्टी घडत असतात. ज्यांना सामंजस्याने सोडवल्या जाते. ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि आम्ही अमेरिकेबरोबरचे संबंध कायम बळकट करत राहू.
महत्त्वाची बाब ही आहे की, ट्रम्प अमेरिकेचा व्यापारातील तोटा कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच ते भारतावर अमेरिकी वस्तूंवर वाढीव दराने शुल्क आकारत असल्याचा आरोप करत आले आहेत. त्यांनी या पार्श्वभूमीवर अमेरिकी संसदेला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, मी हे पाऊल अमेरिका व भारत सरकार दरम्यान झालेल्या गंभीर चर्चेनंतर उचलत आहे. चर्चेत मला असे वाटले की, भारताने अमेरिकेला हा विश्वास दिला नाही की ते अमेरिकेसाठी बाजारपेठ तेवढीच सुलभ बनवतील जेवढी अमेरिकेने त्यांच्यासाठी बनवला आहे.