महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून ३०० किमीवर वादळ उठणार

    दिनांक :10-Jun-2019
मुंबई,
राज्याच्या पश्चिम किनारपट्टीपासून ३०० किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात ११ ते १२ जून दरम्यान वादळ उद्भवण्याची शक्यता राज्य सरकारनं व्यक्त केली आहे. मात्र, हे वादळ किनारपट्टीवर धडकणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढील दोन दिवस किनारपट्टीवर वादळी वारे वाहतील. समुद्रही खवळलेला राहील. याच सुमारास कोकण आणि मुंबईत मोसमी पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सरकारनं मच्छीमार बांधवांना सतर्कतेचा इशारा दिला असून मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. साधारणपणे ७ जूनपर्यंत मोसमी पाऊस मुंबईत दाखल होतो आणि त्यानंतर १५ दिवसांत संपूर्ण राज्यभर पाऊस सुरू होतो. मात्र, यावेळी पाऊस लांबला असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे.