सुभाष घई ‘राम-लखन’ला पुन्हा आणणार एकत्र ?

    दिनांक :10-Jun-2019
बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांपैकी अभिनेता जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांच्याकडे पाहिलं जातं. या दोघांनी ‘राम लखन’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट त्या काळी तुफान लोकप्रिय झाला होता. विशेष म्हणजे या चित्रपटामुळेच ही जोडी प्रचंड लोकप्रिय झाली होती. राम लखननंतर फार कमी वेळा या जोडीने एकत्र काम केलं. मात्र आता लवकरच ही जोडी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 
 
सुभाष घई दिग्दर्शित ‘राम लखन’ या चित्रपटामध्ये दोन भावांच्या नात्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यानंतर तब्बल ३० वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकदा अशाच विषयावर आधारित एका चित्रपटामध्ये काम करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची जबाबदारीदेखील सुभाष घई यांनी घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सुभाष घई यांच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘रामचंद किशनचंद’ असं असून हा चित्रपट क्राइम कॉमेडी या या प्रकारात मोडणारा आहे. या चित्रपटाचं कथानक दोन ५० वर्षीय पोलीस अधिकाऱ्यांच्या भोवती फिरणार आहे. यात हे दोन्ही पोलीस त्यांच्या विनोदी स्वभावामुळे प्रेक्षकांना खळखळून हसविणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या वर्षाअखेरीस ‘रामचंद किशनचंद’च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राम लखन’ या चित्रपटामध्ये जॅकी श्रॉफने एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची व्यक्तीरेखा साकारली आहे, तर अनिल कपूरने एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याची. त्यामुळे दोन भावांमधील संघर्ष या चित्रपटामध्ये दाखविण्यात आला होता.