आर्थिक व्यवस्थापनासाठी...

    दिनांक :10-Jun-2019
आजची तरुणाई अर्थविषयक व्यवहार स्वत: हाताळते. एका अहवालानुसार 25 ते 35 या वयोगटातली देशातली 91 टक्केे तरुण मंडळी स्वत:च आर्थिक व्यवस्थापन करतात. गुंतवणुकीपासून कर्जापर्यंत प्रत्येक गोष्ट ते स्वत: हाताळतात. करबचत हा अर्थनियोजनातला महत्त्वाचा टप्पा असल्याने तरुणांचं त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. आयकराचं नियोजन करताना तरुण करदात्यांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं याविषयी... 

 
 
आयकर कायद्यातल्या कलम ‘80 ई’ नुसार शैक्षणिक कर्जावर करात सवलत मिळण्याची तरतूद आहे. हे कर्ज फेडण्यात उशीर केला तर व्याजाचा बोजा वाढेलच शिवाय तुम्हाला करात सवलतीच्या लाभांनाही मुकावं लागेल. कर्जाची परतफेड वेळेत केल्याने आर्थिक ओझं कमी होण्यासोबत क्रेडिट स्कोअरमध्येही सुधारणा होईल.
 
करबचतीसाठीच्या गुंतवणुकीच्या विविध पर्यायांचा कालावधी आणि त्याच्याशी संबंधित धोके यात फरक असतो. त्यामुळे एकाच पर्यायात खूप मोठी रक्कम गुंतवल्याने तुमचा पोर्टफोलिओ असंतुलित होतो. शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणुकीतले धोके कमी करण्यासाठी तुमच्या गुंतवणुकीत वैविध्य असायला हवं. सर्व रक्कम पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात गुंतवली तर तुम्हाला अवघ्या आठ टक्के दराने व्याज मिळेल. दुसरीकडे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममधली अती गुंतवणूक धोकादायक ठरेल.
 
करबचतीची प्रक्रिया प्रदीर्घ कालावधीसाठी असते. करात सवलत मिळवण्यासाठी शेेवटच्या क्षणी धावाधाव करताना आपल्याकडून चुका होण्याची शक्यता असल्याने आर्थिक वर्ष सुरू होताच करविषयक नियोजनाला सुरूवात करायला हवी. करबचतीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गुंतवणूक करू नका. आपली नेमकी आर्थिक उद्दिष्ट्यं ठरवा. त्यानुसार गुंतवणुकीचे पर्याय निवडा.