साखर उद्योगाला दुष्काळाचा फटका

    दिनांक :10-Jun-2019
 पुणे: सध्याच्या दुष्काळाचा मोठा फटका आगामी गळीत हंगामात साखर उद्योगाला बसण्याची शक्यता आहे. ऊस लागवडीखालील क्षेत्र 30 टक्यांनी घटेल, तर साखर उत्पादन जवळपास निम्यावर येईल, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. चालू गळीत हंगाम संपल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्तांनी यासंबंधी सांगितले.
 
 
 
चालू हंगामात राज्यात 11 लाख 62 हजार हेक्टर्सवर उसाची लागवड करण्यात आली होती. त्यातून 952 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन 107 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. पुढील हंगामात मात्र ऊस लागवडीखालील क्षेत्र 8 लाख 43 हजार हेक्टर्स राहू शकते. पावसाअभावी त्यात आणखी घट होईल. या सर्व बाबीचा परिणाम मराठवाड्यात सर्वाधिक दिसेल. मराठवाड्यात आताच ऊस लागवड 50 टक्के कमी झाली आहे. त्यामुळे साखर उत्पादनही घटेल. आगामी हंगामात 65 लाख टन साखर उत्पादन होईल, असे साखर आयुक्तांनी सांगितले. चालू हंगामात एफआरपीची रक्कम 94 टक्के इतकी देण्यात आली आहे. एफआरपी न देणार्‍या 73 साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई केली आहे. राज्यात 195 खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी गाळप केले आहे. ऊस कमी असल्याचा फटका साखर कारखानदारांना बसणार असला तरी शेतकर्‍यांचे मात्र नुकसान होणार नाही. उसाच्या कमतरतेमुळे शेतकर्‍यांना चांगले दर मिळतील, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.