दिल्लीत पहिल्यांदाच पारा 48 अंश सेल्सिअसवर

    दिनांक :10-Jun-2019
नवी दिल्ली,
देशात मान्सूनचा आगमन झालेले असले तरीही देशातील अनेक शहरांमधील तापमान वाढले आहे. राजधानी दिल्लीतील तापमानाने तर आज सर्व विक्रम मोडीत काढले. आज दिल्लीत तब्बल 48 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. दिल्लीच्या इतिहासातील सर्वाधिक तापमान आज नोंदवले गेल्याची माहिती स्कायमेटने दिली. हवामान खात्याने पालममध्ये 48 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले. 

 
मान्सूनपूर्व पावसाचे आगमन लांबल्याने तापमान वाढले आहे. उष्ण वारे वाहत असल्याने दिल्लीकर मेटाकुटीला आले आहेत. 'दिल्लीच्या पालममध्ये 9 जून 2014 रोजी 47.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. आज पालममध्ये 48 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे हा जूनमधील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे,' अशी माहिती स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पालावात यांनी दिली.
यासोबतच पुढील दोन दिवसदेखील सारखीच परिस्थिती असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. याशिवाय धुळीचे वादळ येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. दिल्लीत पारा 50 अंशांच्या आसपास पोहोचला असताना राजस्थानच्या चुरु शहरात तापमानाने पन्नाशी पार केली आहे. चुरू शहरात पारा तब्ब्ल ५०.३ अंशांवर आहे. त्यामुळे लोकांचे मोठे हाल होत आहेत.