देशी कट्ट्यासह एकास अटक

    दिनांक :10-Jun-2019
वाशीम: वसंत परदेशी यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक पदाचा पदभार स्विकारल्यापासुन वाशीम जिल्ह्यातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीविरोधात धडक कार्यवाह्या करुन गुंड प्रवृत्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हिवरा रोहीला येथून एका आरोपीस देशी कट्टा व 6 जिवंत राउंडसह अटक केली आहे.
 

 
 
 
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शिवा ठाकरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वाशीम तालुक्यातील हिवरा रोहीला येथील वसीम उर्फ रहिमगुल खान पठाण नझर खान पठाण (वय 27) हा अवैधरित्या देशी कट्टा वापरत असल्याची माहिती मिळताच त्यांनी पोलिस अधिक्षक वसंत परेशी व अपर पोलिस अधिक्षक विजयकुमार चव्हा यांचे मार्गदर्शनात सापळा रचला. सदर सापळ्यासाठी सपोनि अतुल मोहनकर व सपोनि अजयकुमार वाढवे यांचे नेतृत्वात त्यांनी दोन पथक तयार करुन कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. दोन्ही पथकाने वसीम उर्फ रहिमगुल खान पठाण नझर खान (वय 27) यास हिवरा रोहीला येथील उर्दु शाळेजवळ मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्याची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे कब्जातुन एक देशी बनावटीचा 60 हजार रुपये किमतीचा देशी कट्टा व 6 जिवंत राउंड हस्तगत केले. सदर आरोपीविरुद्ध वाशीम ग्रामीण पोलिस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांचे मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, अजयकुमार वाढवे, सपोउपनि भगवान गावंडे, पोना प्रशांत राजगुरु, किशोर चिंचोळकर, पोशि अमोल इंगोले, राजु गिरी, संतोष शेणकुडे, प्रविण राऊत यांच्या पथकाने केली आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक वाशीम यांनी अपप्रवृत्ती विरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेत सातत्यपुर्ण कामगिरीमुळे जनतेत सर्वत्र समाधान व्यक्त होते.