मोदी यांचा मालदीव आणि श्रीलंका दौरा...

    दिनांक :10-Jun-2019
पंतप्रधानपदाची शपथ घेऊन दहा दिवसही होत नाही, तोच नरेंद्र मोदी कामाला लागले आहेत. ते मालदीव आणि श्रीलंकेच्या दौर्‍यावर गेले. मालदीव हा भारताच्या तुलनेत अतिशय चिमुकला देश, भारतातील अनेक शहरांपेक्षाही पर्यटनासाठी ओळखला जाणारा हा देश लहान आहे. त्यामुळे मोदी, मालदीव आणि श्रीलंकेच्या दौर्‍यावर का गेले, असा प्रश्न सर्वांनाच पडू शकतो. या प्रश्नाचे उत्तर मोदी यांनी मालदीवच्या संसदेत केलेल्या भाषणातून मिळाले आहे. आपल्या या दौर्‍यातून मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानला झटका दिला आहे.
 

 
 
मोदी यांच्याबद्दल आपल्याला किती आस्था आणि आदर आहे, हे मालदीवने दाखवून दिले आहे. मालदीवमधील सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. मात्र, हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मोदी तेथे गेले नाहीत, तर जागतिक राजकारणात भारताला एक महाशक्ती म्हणून विकसित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गेले. मोदी यांनी आतापर्यंत देशांतर्गत राजकारणात चौकीदाराची भूमिका पार पाडली, आता आंतरराष्ट्रीय राजकारणातही चौकीदाराची भूमिका पार पाडण्याचा त्यांचा हेतू काही प्रमाणात सफल होताना दिसत आहे. आपल्या पहिल्या शपथविधी समारंभासाठी मोदी यांनी ‘सार्क’ देशांचे राष्ट्रप्रमुख तसेच पंतप्रधानांना आमंत्रित केले होते. पंतप्रधानपदाची सूत्रे दुसर्‍यांदा स्वीकारत असताना मोदी यांनी या समारंभासाठी ‘बिमस्टेक’ देशांचे राष्ट्रप्रमुख तसेच पंतप्रधानांना बोलावले होते. यात मालदीवचाही समावेश होता.
‘नेबरर फर्स्ट,’ ही मोदी यांची नेहमीच भूमिका राहिली आहे. तुमच्या मदतीला सर्वप्रथम शेजारीच धावून येतात, हे त्रिकालाबाधित सत्य माणसांच्याच नाही, तर देशाच्याही बाबतीत खरे आहे. त्यामुळे शेजार्‍यांशी असलेले मैत्रिपूर्ण संबंध आणखी दृढ करण्याची मोदी यांची भूमिका आहे. मात्र, शेजारीही तसेच असला पाहिजे. आपल्या पहिल्या शपथविधी समारंभासाठी, पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना आमंत्रित करणार्‍या मोदी यांनी यावेळी आपल्या दुसर्‍या शपथविधी समारंभासाठी पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांना आमंत्रित न करता त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे इम्रान खान यांचा चांगलाच मुखभंग झाला आहे.
मोदी यांनी पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला, पण पाकिस्तानने त्याला तसाच प्रतिसाद दिला नाही. भारतात दहशतवादी कारवाया करणे पाकिस्तानने थांबवले नाही. याबाबतच्या आपल्या तीव्र भावना मोदी यांनी मालदीवच्या संसदेला संबोधित करताना व्यक्त केल्या. दहशतवाद हे आजच्या जगासमोरील मोठे आव्हान आहे, या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी जगातील सर्व मानवतावादी देशांनी एकत्र येण्याचे आवाहन मोदी यांनी केले. सरकारसमर्थित दहशतवादाचा निषेध करताना मोदी यांनी कोणत्याही देशाचे नाव घेतले नसले, तरी त्यांचा रोख कुणाकडे होता, हे सर्वविदित आहे. दहशतवादात चांगला आणि वाईट असा भेद नसतो, दहशतवाद हा दहशतवादच असतो, असे मोदी म्हणाले.
मोदी यांनी मालदीवसमोर मैत्रीचा हात पुढेे केला आहे. मैत्रीमध्ये कुणी लहान वा मोठा नसतो, तर मैत्रीत दोन्ही बाजू समानपातळीवर असतात, असे सांगताना मोदी यांनी चीनची मालदीवबाबतची काळी बाजू समोर आणली आहे. चीनने मालदीवसमोर मैत्रीचा हात पुढे करत तसेच त्याला आर्थिक मदतीचे आमिष दाखवत कर्जाच्या सापळ्‌यात अडकवले आहे. याआधीचे राज्यकर्ते चीनच्या या भूमिकेला बळी पडले. या मार्गाने या छोट्याशा देशालाच गिळंकृत करण्याचे चीनचे षडयंत्र मोदी यांनी जगासमोर आणले आणि मालदीवला सावध केले. फक्त सावधच केले नाही, तर यातून बाहेर निघण्यासाठी सहकार्याचे आश्वासनही दिले. विशेष म्हणजे मालदीवमधील विद्यमान सरकारची भूमिका भारताबद्दल नेहमीच सहानुभूतीची राहिली आहे. मालदीव गिळंकृत करण्याचे चीनचे षडयंत्र यशस्वी झाले असते, तर त्याचा धोका भारतीय उपखंडातील सर्वच देशांना बसला असता. भारतासह उपखंडातील अनेक देशांच्या सुरक्षेला आणि सार्वभौमत्वाला गंभीर धोका निर्माण झाला असता. याची जाणीव मोदी यांना सर्वात प्रथम झाली. त्यामुळे त्यांनी आपल्या पहिल्या परदेश दौर्‍यासाठी याच देशाची निवड केली. भारताची विकासात्मक भागीदारीची भूमिका ही लोकांना सशक्त करणारी आहे, कमजोर करणारी नाही, दुसर्‍या देशाला आपल्यावर आश्रित करणारी तसेच नवीन पिढीवर कर्जाचा डोंगर उभा करणारी नाही, हे सांगताना मोदी यांनी चीनच्या स्वार्थी भूमिकेचाही पर्दाफाश केला. चीनची ही भूमिका नवी नाही. चीनने सुरुवातीच्या काळात भारताच्या पाठीतही खंजीर खुपसायला मागेपुढे पाहिले नाही. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, ‘िंहदी-चिनी भाईभाई’चा नारा देत असताना, चीनने भारतावर आक्रमण करून युद्ध लादले होते. भारताचे त्या वेळी खूप नुकसान झाले असले, तरी भारत त्या वेळी चीनचा गुलाम झाला नाही. आज त्याच वाटेने मालदीव चालला आहे. त्यामुळे या देशाला सावध करण्याची जबाबदारी मोठा भाऊ म्हणून मोदी यांनी पार पाडली आहे.
दहशतवादी संघटनांच्या बँका नसतात, शस्त्रास्त्रांचे कारखाने नसतात, तरी त्यांना पैसा आणि शस्त्रास्त्रे कशी मिळतात, अशी विचारणा करत मोदी यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला आरोपीच्या िंपजर्‍यात उभे केले आहे. दहशतवादाची पाठराखण करण्याची पाकिस्तानची भूमिका जगात आता लपून राहिली नाही. त्यामुळे पाकिस्तानसमर्थित दहशतवाद ही जगासमोरील मोठी समस्या असल्याचे सांगताना मोदी यांनी, ‘इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा’ या भूमिकेतून दहशतवादाचा खात्मा करताना पाकिस्तानलाही जगाने धडा शिकवण्याची आवश्यकता प्रतिपादित केली.
आपल्या मालदीव दौर्‍यातून मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानमुळे उद्भवणार्‍या धोक्याकडे जगाचे लक्ष वेधले आहे. चीन आणि पाकिस्तान आज एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांना रोखण्याचे मोठे आव्हान जगासमोर उभे ठाकले आहे. मालदीवमध्ये दहशतवादाच्या समस्येचा उल्लेख करणार्‍या मोदी यांना, श्रीलंकेतील दहशतवादात बळी पडलेल्यांनाही श्रद्धांजली वाहावी लागली. मुळात दहशतवाद ही आता काही मोजक्या देशांची समस्या राहिली नाही, तर सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी अशी समस्या झाली आहे. त्यामुळे ‘मला काय त्याचे,’ ही भूमिका कुणाला घेता येणार नाही. त्यामुळेच दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी जगाने एकत्र येण्याचे आवाहन मोदी यांनी केले. सार्‍या जगाचा विचार करताना मोदी यांनी भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम्‌’ या भूमिकेचाही जगाला परिचय करून दिला आहे. मुळात आज जगात शांतता नांदत असेल, तर देशांमध्ये शांतता राहू शकते. याचे भान सवार्र्ंनीच ठेवण्याची गरज आहे. मात्र, चीन आणि पाकिस्तानची भूमिका यापेक्षा वेेगळी आहे. पाकिस्तानची भूमिका ही नेहमीच दहशतवादाला खतपाणी घालण्याची, विशेषत: भारतात दहशतवादी कारवाया घडवण्याची राहिली आहे. चीन प्रत्यक्षपणे दहशतवादी कारवायांत गुंतला नसला, तरी आपल्या आजूबाजूचे छोटेमोठे देश गिळंकृत करण्यासाठी षडयंत्र रचण्याची त्याची नेहमीचीच भूमिका राहिली आहे. त्या अर्थाने पाकिस्तान सापनाथ असेल तर चीन नागनाथ आहे! आपल्या मालदीव आणि श्रीलंका दौर्‍यातून याच मोठ्या धोक्याकडे मोदी यांनी जगाचे लक्ष वेधले आहे. हीच त्यांची या दोन्ही देशांच्या दौर्‍याची उपलब्धी म्हणावी लागेल!