वाशीम शहराला गाळयुक्त व पिवळसर पाण्याचा पुरवठा

    दिनांक :10-Jun-2019
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पालिका व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
 
वाशीम: मागील अनेक दिवसापासून शहरामध्ये पालिका प्रशासनाकडून गाळयुक्त व पिवळसर दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने शहरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रकाराची जिल्हा प्रशासनाने त्वरीत दखल घेवून वाशीम पालिका प्रशासनातील जबाबदार अधिकारी व पदाधिकार्‍याविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.
वाशीम शहराला एकबुर्जी धरणामधून पाणीपुरवठा करण्यात येतो. मागील अनेक महिन्यापासून पालिका प्रशासनाकडून शहरातील विविध भागात 10 ते 15 दिवसाच्या फरकाने पाणी पुरवठा केला जातो. पालिका प्रशासनाने शहरातील पाणीपुरवठा घेणार्‍या नागरिकांना 24 तास पाणी पुरवठा करणार या आश्‍वासनाच्या नावाखाली 800 रुपयावरुन पाणीपट्टी 2 हजार रुपये केली आहे. मात्र, शहरवासियांकडून ज्यादा पैसे घेवूनही दररोज पाणी पुरवठा शहरामध्ये करण्यासाठी आजपर्यंत वाशीम पालिका प्रशासनाने कोणताही पुढाकार घेतला नसल्याची माहिती आहे.
 
 
शहरवासीयांना शुध्द पाणी पुरवठा व्हावा यासाठी पाणी शुध्दीकरण प्रकल्प सुद्धा आहे. या प्रकल्पामध्ये पाणी शुध्दीकरणासाठी जो आलम नावाचा पदार्थ वापरतात त्या आलम वर सुध्दा बुरशीजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने शहरातील नागरिकांना आता बुरशीजन्य विषाणूच्या आजाराची लागण होण्याची शक्यता असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. पालिका प्रशासन शहरामध्ये 10 ते 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना मिळणारे पाणी सुद्धा गढूळ व दुषित असले तरीही नागरिकांना हेच पाणी घरामध्ये तब्बल 10 ते 15 दिवस नाईलाजाने साठवूण ठेवण्याची वेळ आली आहे.
शहरामध्ये दुषित व गाळयुक्त पाण्याचा पुरवठा सुरू असल्याची पालिकेचे सर्व पाधिकारी व पालिकेच्या सर्व जाबबदार अधिकार्‍यांना माहित आहे. काही पदाधिकारी या गंभीर बाबी च्या विरोधात आवाज उवठवण्याचा प्रयत्न करतात. परंतु, त्यांचा आवाजही पालिकेच्या मिटींगमध्ये काजू बदामाचे पाकीटे देवून दाबल्या जात असल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे. यावर्षी आधीच उन्हाचा पारा वाढला असल्यामुळे शहरवासीयांना पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे पालिका प्रशासनाकडून शहरात 10 ते 15 दिवसाआड होार्‍या दुषित पाणी पुरवठ्यामुळे सुध्दा विविध आजार होण्याची शक्यता आहे. या गंभीर बाबीची जिल्हा प्रशासन व पालिका प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन वाशीमकरांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा. पालिका प्रशासनातील काही बेजबाबदार अधिकारी व कर्मचार्‍याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीयांची आहे.