प्रफुल्ल पटेल ईडीपुढे हजर

    दिनांक :10-Jun-2019
 नवी दिल्ली:संपुआ सरकारच्या काळातील कोट्यवधी रुपयांच्या हवाई घोटाळााप्रकरणी माजी नागरी उड्डयण मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंगे्रसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आज सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) येथील मुख्यालयात हजर झाले. सुमारे चार तास त्यांची चौकशी करण्यात आली.
पटेल यांना गेल्या आठवड्यातही ईडीने समन्स बजावला होता, पण आधीच ठरलेल्या व्यस्त कार्यक्रमांमुळे ते हजर झाले नव्हते. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा समन्स जारी करण्यात आला होता. त्यानुसार आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ते हजर झाले.
 

 
 
 
ईडीने या घोटाळ्याप्रकरणी लॉबिस्ट दीपक तलवारला आधीच अटक केली असून, सध्या तो तुरुंगात आहे. दीपक तलवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात अतिशय जवळचे संबंध असून, या घोटाळ्याच्या काळात तलवारने अनेकदा पटेल यांची भेट घेतली आहे, असेही ईडीच्या तपासात दिसून आले आहे. विशेष म्हणजे, ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातही पटेल यांचे नाव आहे. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग तलवारने तीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले होते. या मोबदल्यात त्याला 2008-09 या कालावधीत 272 कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता, असा दावा ईडीने न्यायालयात केला होता. याशिवाय, एअर इंडियाची आर्थिक स्थिती चांगली नसतानाही 70,000 कोटी रुपये किमतीच्या 111 विमानांची खरेदी, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलिनीकरण, परकीय गुंतवणूकीतून प्रशिक्षण संस्था सुरू करणे, तसेच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग खाजगी कंपन्यांना देणे, अशा चार प्रकरणी ईडीने आज प्रफुल्ल पटेल यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला आणि त्यांचे बयाण नोंदवून घेतले.