पंढरपूर यात्रेनिमित्त तीन हजार अतिरिक्त बसेस : रावते

    दिनांक :10-Jun-2019
 पुणे: राज्य परिवहन महामंडळ यंदा पंढरपूरमध्ये होणार्‍या आषाढी यात्रानिमित्त नियमित फेर्‍यांव्यतिरिक्त सुमारे तीन हजार 724 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली. पुणे येथे आषाढी एकादशी निमित्त करावयाच्या वाहतूक नियोजन बैठकीमध्ये ते बोलत होते.
संपूर्ण राज्यातून पंढरपूरला येणार्‍या भाविकांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटीचे सुमारे पाच हजार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी व अधिकारी पंढरपूर येथे 10 ते 16 जुलैपर्यंत अहोरात्र कार्यरत राहतील, अशी माहिती परिवहन मंत्री रावते यांनी दिली.
 
 
 
 
पंढरपूरची आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. भाविकांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे, विठ्ठलाचे दर्शन घडवून सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी एसटीवर आहे. त्यासाठी जादा वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्‍या बसेस यांत्रिकदृष्ट्या निर्दोष, स्वच्छ व आकर्षक असल्या पाहिजेत, अशा सूचनाही रावते यांनी यावेळी केल्या.
नव्याने बांधणी केलेल्या माईल्ड स्टीलच्या सुमारे 1200 आकर्षक बसेस भाविक-प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील पंढरपूरकडे येणार्‍या विविध प्रमुख मार्गावर एसटीची दुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विभागवार बसेस : औरंगाबाद- 1097, पुणे- 1080, नाशिक- 692, अमरावती- 533, मुंबई- 212, नागपूर- 110