ऋतुजाच्या नावाची राष्ट्रीय स्तरावर नोंद

    दिनांक :10-Jun-2019
काही महिन्यांपूर्वी रंगभूमीवर आलेलं ‘अनन्या’ हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. प्रतिकूल परिस्थितीशी टक्कर घेत स्वत:चं आयुष्य बदलू पाहणारी ‘अनन्या’ अभिनेत्री ऋतुजा बागवेनं तडफेनं साकारली. तिच्या या भूमिकेचं भरभरुन कौतुक झालं. ऋतुजाच्या या अतुलनीय अभिनयासाठी आजवर बारा मानाच्या पुरस्कारांनी तिचा गौरव करण्यात आला आहे. आणि आता तर मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’नंही ऋतुजाच्या या झळाळत्या यशाची दखल घेतली आहे. 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्'मध्ये ‘मोस्ट अॅवॉर्ड्स फॉर अ परफॉर्मन्स इन द इयर’ या रेकॉर्ड टायटलअंतर्गत ऋतुजाच्या नावाची नोंद राष्ट्रीय स्तरावर झाली आहे.

 
 
सध्या ‘अनन्या’ नाटक अमेरिका दौऱ्यावर आहे. लवकरच मुंबईमध्ये या नाटकाचा २५० वा प्रयोग रंगणार आहे. गेल्या वर्षभरात ऋतुजाच्या भूमिकेचं दिग्गजांकडून कौतुक झालं. कधी मान्यवरांनी केलेल्या कौतुकाच्या रुपानं तर कधी पारितोषिकांच्या रुपानं तिला तिच्या कामाची पोचपावती मिळाली. यात मराठी इंडस्ट्रीत मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'मटा सन्मान' पुरस्काराचाही समावेश होता. त्याशिवाय राज्य शासनाचा पुरस्कार, ‘पंडित दीनानाथ मंगेशकर’, ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा पुरस्कार, 'रंगप्रतिभा', 'एकता', 'संस्कृती कलादर्पण', 'साहित्य संघ', 'मुंबई गौरव', 'महाराष्ट्रीय ऑफ द इयर' आदी पुरस्कारांचाही समावेश आहे. याबाबत अमेरिकेहून ‘मुंटा’शी संवाद साधताना ऋतुजा ती म्हणाली, की ‘माझ्या आईला अभिनेत्री व्हायचं होतं. पण, ती डॉक्टर झाली. तिच्यातले अभिनयाचे गुण माझ्यात उतरले आहेत. माझ्या आईची इच्छा मी माझ्या करिअरच्या माध्यमातून पूर्ण करत आहे.’ रेकॉर्डसाठी माझं काम पाठवण्याचं पूर्वनियोजन माझे आई-बाबा आणि बहिणीनं केलं. सुरुवातीला मला या रेकॉर्डबाबत माहीत नव्हतं. हे संपूर्ण श्रेय माझ्या घरच्यांचं आणि नाटकाच्या टीमचं आहे.