कठुआ बलात्कार अन् हत्याप्रकरणी तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

    दिनांक :10-Jun-2019
श्रीनगर,
जम्मू-काश्मीरमधील कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी पठाणकोट न्यायालयाने तीन आरोपीना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी संजीराम, प्रवेश कुमार, दीपक खजुरिया यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच संजीराम, दीपक खजुरिया आणि प्रवेश कुमार यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. यासोबतच दोन्ही दोषी पोलिस अधिकाऱ्यांना ५-५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
 
 
 
कठुआ येथील एका 8 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले व त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती. या मुलीला 10 जानेवारी रोजी अपहरण करून तिला मंदिरामध्ये कोंडून ठेवण्यात आले. गुंगीचे औषध दिल्यानंतर या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. तर 17 जानेवारीला जंगलात तिचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला.
 
 
 
आरोपींमध्ये संजीराम, पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्ता, दोन विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरिया आणि सुरेंद्र वर्मा, हेट कॉन्स्टेबल टिळक राज आणि स्थानिक नागरिक परवेश कुमार यांच्याविरुद्ध बलात्कार, खून आणि पुरावे मिटवण्याच्या कृत्यांच्या आधारावर अनेक कलम लावण्यात आली होती. आज सकाळी न्यायालयाने सात पैकी सहा आरोपींना दोषी ठरवले तर एका आरोपीला सबळपुराव्याअभावी दोषमुक्त केले.
 
सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याची सुनावणी जम्मू- काश्मीरबाहेर घेण्याचे आदेश दिले होते. यानुसार पठाणकोटमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. ३ जूनला या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती. या प्रकरणात एकूण ११४ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. सोमवारी न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला.