काही लोक अजूनही पराभवाच्या धक्क्यातच; मोदींचा राहुल गांधींना टोला

    दिनांक :10-Jun-2019
लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या धक्क्यातून काही लोक अद्याप बाहेर पडू शकलेले नाहीत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३०३ जागा मिळाल्या. तर भाजपा आणि घटकपक्ष यांच्या जागांची संख्या ३५० च्या पुढे गेली. काँग्रेसचं या निवडणुकीत अक्षरशः पानिपत झालं. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच वायनाडमध्ये आले. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरस्कार आणि द्वेष यांचं राजकारण केलं. तसंच देशाच्या जनतेशी खोटं बोलून नरेंद्र मोदींनी निवडणूक जिंकली असा आरोप केला होता. या आरोपांना उत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजून काही लोक लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या धक्क्यातून बाहेरच आलेले नाहीत असा टोला लगावला आहे.
 
 
मी देशामध्ये तिरस्कार आणि द्वेष यांचं विष पसरवलं असं विरोधकांना वाटत असेल तर काहीही करू शकत नाही. कारण त्यांची बाजू कमकुवत आहे. आमच्यासाठी आता निवडणूक हा विषय संपला आहे. १३० कोटी भारतीय नागरिकांचा विकास साधणं हे आता आमच्यापुढचं लक्ष्य आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
काय म्हटले होते राहुल गांधी?
लोकसभा निवडणूक प्रचार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वेष आणि तिरस्कार यांचं विष पसरवलं. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कठोर शब्द वापरले. मात्र त्यांनी द्वेष, तिरस्कार आणि विभाजन यांचं विष पसरवलं आणि खोटं बोलून निवडणूक जिंकली. देशाबाबत बोलताना त्यांनी जराही जनतेचा विचार केला नाही असं राहुल गांधी यांनी त्यांच्या वायनाड येथील भाषणात म्हटलं होतं. आता याच टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उत्तर दिलं आहे. पराभवाच्या धक्क्यातून काँग्रेसचे नेते अजून सावरले नसल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली आहे.