नगराध्यक्षांनी शासकीय जागेवर बांधलेली उर्दु शाळा पाडण्याबाबत न्यायालयाचा 'स्टे ऑर्डर'

    दिनांक :10-Jun-2019
मेहकर: काँग्रेसचे नगराध्यक्ष कासम गवळी यांनी बांधलेली उर्दु शाळा शासनाच्या ई क्लास जमीनीवर अतिक्रमण असून ती पाडण्यासाठी महसूल प्रशासनाने ९ जून पर्यंत मुदत दिली होती. मात्र आज नगराध्यक्ष कासम गवळी यांनी दिवानी न्यायालय वरिष्ठ स्तर कडून १७ ता पर्यंत जैसे थे चा आदेश मिळवला असल्याने कारवाई लांबली आहे.
 
 
 
 
सविस्तर असे की नगराध्यक्ष कासम गवळी यांची पिर महंमद उर्दु हायस्कूल ही शैक्षणिक संस्था शहरात आहे. शाळेचे पक्के बांधकाम झालेले आहे. मात्र ही जागा सर्व्हे नं १२ ई क्लास जमिनीवर अतिक्रमण असून ती पाडण्यासाठी अहेमद शहा सबदर शहा यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा कडे तक्रार केली होती. त्यानुसार १ जूनला जिल्हाधिकारी यांनी हे अतिक्रमण हटविण्यासाठी मेहकर महसूल कार्यालयास निर्देश दिले होते.नायब तहसीलदार, मेहकर यांनी ७ जूनला संस्था अध्यक्ष तथा नगराध्यक्ष कासम गवळी यांना लेखी पत्र देऊन ९ जून पर्यंत अतिक्रमण हटविण्यात यावे असे कळवून ,न काढल्यास शासकीय कारवाई ने काढण्यात येईल असे पत्र दिले होते. आज सकाळपासून च शहरात भरपूर पोलीस फोर्स पोलीस ठाण्यात तयार होता.तर या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक व कासम गवळी यांचे समर्थक यांनी तहसीलदार डॉ संजय गरकल यांची भेट घेऊन पर्यायी व्यवस्था होईपर्यत कारवाई थांबवण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. मात्र हे प्रकरण न्यायालयात गेल्या नंतर आज दिवानी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायाधीश पी टी गोटे यांनी १७ जून पर्यंत जैसे थे चा आदेश दिल्याने कारवाई आज झाली नाही. नगराध्यक्ष कडुन अँड बि के गांधी(अकोला) व अँड गजानन लांडगे यांनी काम पाहिले.