प.बंगालच्या राज्यपालांनी घेतली अमित शहांची भेट

    दिनांक :10-Jun-2019
नवी दिल्ली,
पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी भाजपा करण्याची शक्यता आहे. भाजपाचेपश्चिम बंगालमधील प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितते की, राज्यातील परिस्थिती नियंत्रणात नाही आहे. त्यामुळे भाजपा राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी करु शकते. तसेच, भाजपाची वैचारिक भूमिका राष्ट्रपती शासन विरोधात आहे. मात्र, राज्यात सरकार चालवण्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पूर्णपणे अयशस्वी ठरल्या आहेत.
 
 
पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता केसरीनाथ त्रिपाठी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार वाढला आहे.
 
 
आज भाजपाच्यावतीने बशीरहाटसह संपूर्ण बंगालमध्ये 12 तासांचा बंद पुकारण्यात आलेला आहे. भाजपा हा दिवस काळा दिवस म्हणुनही पाळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भाजपाचे नेता राहुल सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'राज्य सरकारच्या मनमानी विरोधात सोमवारी बशीरहाटमध्ये 12 तासांचा बंद पुकारण्यात आला आहे. तसेच भाजपा संपूर्ण राज्यात काळा दिवस पाळणार आहे.'
 
 
पश्चिम बंगालमध्ये भाजपा व तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांमधील वाद वाढत आहे. शनिवारी परगना जिल्ह्यामध्ये पार्टीचे झेंडे काढून फेकल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. या घटनेनंतर तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपाच्या पाच कार्यकर्त्यांची गोळ्या घालून हत्या केली असल्याचा भाजपाकडून दावा करण्यात आला आहे. तर 18 जण बेपत्ता असल्याचेही सांगण्यात आले आहे. तर तृणमूल काँग्रेसनेही त्यांच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्याचे म्हटले आहे.