2011च्या वर्ल्ड कप विजयाचा हिरो युवराज सिंगची निवृत्तीची घोषणा

    दिनांक :10-Jun-2019
मुंबई,
भारताच्या 2011च्या वर्ल्ड कपमधील मालिकावीर आणि सिक्सर किंग म्हणून ओळख असलेल्या युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे आज सोमवारी जाहीर केले. मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्याने ही घोषणा केली. त्याने 2012मध्ये अखेरची कसोटी, तर 2017मध्ये अखेरच्या मर्यादित षटकांचा सामना खेळला आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्येही त्याने यंदा मुंबई इंडियन्सकडून केवळ 4 सामने खेळले. त्यात त्याने एका अर्धशतकासह 98 धावा केल्या. ही घोषणा करताना युवी भावूक झाला होता... 17 वर्षांच्या कारकिर्दीत मी अनेक चढउतार पाहिले. क्रिकेटने मला सर्व काही दिलं आणि म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे, असे तो म्हणाला. 

 
गेली दोन वर्ष युवराज भारताकडून एकही एकदिवसीय किंवा टी -20 सामना खेळलेला नाही. भविष्यातही त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळेल याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे त्याने निवृत्ती स्वीकारण्याचे ठरवले आहे. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मान्यतेने होणाऱ्या परदेशातील टी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी, अशी अट त्याने ठेवली होती.
 
 
 
युवीने 40 कसोटी सामन्यांत 33.92 च्या सरासरीने 1900 धावा केल्या आणि 9 विकेट्सही घेतल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 304 सामने आहेत आणि त्यात त्याने 36.55च्या सरासरीने 8701 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 111 विकेट्सही आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 58 सामन्यांत 1177 धावा व 28 विकेट्स घेतल्या आहेत.