'या' एकाच गोष्टीची खंत : युवराज सिंग

    दिनांक :10-Jun-2019
मुंबई,
सिक्सर किंग युवराज सिंगने आज सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. मुंबईत युवराजने निवृत्तीची घोषणा केली. युवीने निवृत्तीची घोषणा करताना त्याच्या मनातील एक खंत व्यक्त केली. 'माझ्या १७ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत मला जास्त कसोटी सामने खेळता आले नाहीत. याची खंत नेहमीच राहील. आजारपणामुळे मला कसोटी सामन्यांपासून दूर राहावे लागले आणि ते माझ्या हातात नव्हते', असे युवराज म्हणाला.

युवराजने ४० कसोटी सामन्यांत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. कसोटी कारकिर्दीत युवराजने ३३.९२ च्या सरासरीने १९०० धावा केल्या आहेत. यात तीन शतकं आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे क्रिकेटमध्ये युवीची कामगिरी दमदार राहीली आहे. युवीने वनडे करिअरमध्ये ३०४ सामन्यात ८७०१ धावांचा रतीब घातला आहे. तर १११ बळीही घेतलेत.