उष्माघातामुळे चार रेल्वे प्रवाशांचा मृत्यू

    दिनांक :11-Jun-2019
- केरळ एक्सप्रेसमधील घटना
आग्रा,
देशात वाढत्या तापमानामुळे उष्णतेचे प्रमाणही वाढले आहे. उष्माघातामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यात बाहेर उघड्यावर राहणार्‍यांचे प्रमाण जास्त असले तरी एका वृत्तानुसार रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांनाही उष्णतेचा फटका बसून चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे. उत्तरप्रदेशातील आग्रा ते झाशी मार्गादरम्यान केरळ एक्सप्रेसमधील स्लीपर कोचमध्ये प्रवास करणार्‍या चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तर भारतात वाढत्या तापमानाने उच्चांक गाठला असून अनेक शहरात गर्मीमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागले आहेत.
 
 
 
सोमवारी मथुरा येथे तापमान 50 अंश सेल्सियसवर पोहचले होते. उन्हाचा तडाखा आणि गर्मीमुळे रेल्वे गाडीतून प्रवास करणार्‍यांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत. ही गाडी निजामुद्दीनपासून तिरुवनंतपुरम्ला जात होती. आगर्‍यावरून निघाल्यानंतर गाडीमधील 5 प्रवाशांची प्रकृती बिघडली. ज्यातील 4 जणांचा मृत्यू झाला. झाशी रेल्वे स्टेशनवर या चार जणांचा मृतदेह उतरविण्यात आला. त्यांच्या नातेवाईकांना रेल्वे प्रशासनाकडून माहिती देण्यात आली.
 
दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून या घटनेवर कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. उत्तर-मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज कुमार िंसह यांनी, तांत्रिक कारणामुळे गाडी उशिराने धावत होती. मात्र, या प्रवाशांची तब्येत आधीपासून खराब होती. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळू शकेल, असे सांगितले.
 
दहा दिवसांपूर्वी 68 प्रवाशांचा एक गट तामिळनाडूहून वाराणसी आणि आग्रा येथे पर्यटनासाठी आला होता. वाराणसीनंतर ते आग्रा येथे पोहचले व तिथे या गाडीत बसले. गाडीत उपचारासाठी सोय न मिळाल्याने चार जणांचा मृत्यू झाला, सहप्रवाशांनी सांगितले. उत्तरप्रदेशमध्ये रविवारी सर्वाधिक तापमान बांदामध्ये नोंदवले गेले होते. बांदामध्ये 49 अंश सेल्सियस तापमान होते, तर महोबामध्ये 47 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती.