लवकरच फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार

    दिनांक :11-Jun-2019
मुंबई,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचे सांगितले आहे. येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे मुनगंटीवार म्हणाले. शिवसेना आणि मित्र पक्षांनाही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, असे सूतोवाच मुनगंटीवार यांनी केले आहेत. 
 
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार दिल्लीत माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत असलेल्या कोअर समितीच्या बैठकीसाठी ते आले होते. भाजपच्या मुख्यालयात महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड येथील आगामी विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात अमित शाह यांनी बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र भाजपाच्या कोअर समितीचे सदस्य उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन, मंत्रिमंडळ विस्तार, महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी आवश्यक निधी आदींच्या बाबतीत अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाली. ‘आम्ही पूर्णपणे विधानसभा ‘निवडणुकीच्या मोड’मध्ये आलो आहोत. त्यामुळे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यात काही आवश्यक बदल करावे लागणार आहेत. प्रशासन अधिक गतीमान करण्याच्या दृष्टीनेही काही महत्त्वाचे निर्णय घेणे आवश्यक आहेत,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.