टीम इंडियाला धक्का, शिखर धवन दुखापतीमुळे वर्ल्डकपबाहेर

    दिनांक :11-Jun-2019
लंडन,
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दमदार शतक ठोकणारा भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे वर्ल्डकपला मुकण्याची शक्यता आहे. गेल्या सामन्यात शिखरच्या हाताच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला किमान तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे फॉर्मात आलेला धवन संघाबाहेर गेल्याने टीम इंडियाला मोठा हादरा बसला आहे. 
 
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनच्या हातावर चेंडू आदळला होता. यामुळे शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. शिखरचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले असून त्याला किमान तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे शिखर धवन वर्ल्डकपला मुकण्याची चिन्हे आहेत. 
 
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात नॅथन कुल्टर-नाइलचा चेंडू धवनच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर आदळला. यामुळे धवन क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. त्याच्याजागी बदली खेळाडू म्हणून रविंद्र जडेजा क्षेत्ररक्षणासाठी आला होता. 
दरम्यान, शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याने रोहित शर्मासोबत सलामीला लोकेश राहुल येण्याची शक्यता आहे. तसेच मधल्या फळीत अनुभवी दिनेश कार्तिक किंवा अष्टपैलू विजय शंकर याचा संघात समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे. याशिवाय रिषभ पंतचे नावदेखील चर्चेत आहे.