अमिताभनंतर अदनान सामीचंही ट्विटर अकाउंट हॅक

    दिनांक :11-Jun-2019
अभिनेता अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानंतर आता गायक अदनान सामीचं ट्विटर अकाउंटही हॅक करण्यात आलं आहे. अमिताभ यांचं अकाउंट ज्या प्रकारे हॅक झालंय अगदी त्याच पद्धतीनं सामीचं अकाउंटही हॅक झालंय.
 
 
हॅकर्सनी अदनान सामीच्या ट्विटर अकाउंटचा प्रोफाइल पिक्चर बदलून त्याजागी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचं छायाचित्र लावलं आहे. अमिताभ यांच्याबाबतीही हाच प्रकार करण्यात आला होता. अदनानच्या अकाउंटवर हॅकर्सनी अनेक ट्विट पोस्ट केलेत. यापैकी एक ट्विट पिन करण्यात आलं आहे. त्यात असं लिहिलंय की, 'जे कुणी आमचा मित्र देश पाकिस्तानसोबत दगा करतील त्यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं आणि पाकिस्तानच्या झेंड्याचं छायाचित्र प्रोफाइलवर दिसेल.' 
 
 
 
'तुझं अकाउंट तुर्कस्तानची सायबर आर्मी Ayyıldız Timने हॅक केलं आहे. तुझं बोलणं आणि महत्त्वाचा डेटाही ताब्यात घेतला आहे,' असंही हॅकर्सनी कळवलं आहे. अदनानने त्याचं ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची माहिती अन्य एका अकाउंटद्वारे त्याच्या चाहत्यांना दिली आहे.