देवभूमी- उत्तराखंड!

    दिनांक :11-Jun-2019
 डॉ. उदय राजहंस
9049605808
 
उत्तराखंड राज्याला ‘देवभूमी’ म्हणूनही संबोधिलं जातं. उत्तराखंडचे मुख्य दोन भाग पडतात. पूर्वेकडचा कुमांऊ गढवाल आणि पश्चिमेकडील टिहरी गढवाल. जर संपूर्ण उत्तराखंड हे देवभूमी असेल, तर या देवभूमीत, देवाचं घर मात्र ‘कुमांऊ गढवाल’ या भागाला आहे, असं मानतात. तर अशा या देवाच्या घरात जाण्याचा सुरेख योग इतक्यात आला आणि सर्वांगसुंदर अनुभव घेऊन परतलो.
 
सुरुवात तर नैनीतालपासून झाली. समुद्रसपाटीपासून 2084 मीटर उंचीवरील हे नयनरम्य ठिकाण. दक्षाच्या यज्ञात भगवान शंकराला बोलावले नाही, याच्या रागावर सतीने योगमायेने प्राणत्याग केला. ते कलेवर हातावर घेऊन शंकराने तांडवनृत्य सुरू केले व पृथ्वीचा नाश होण्याचे संकेत मिळू लागले. सगळ्या देवांच्या विनंतीला मान देऊन विष्णूने आपल्या सुदर्शनचक्राने सतीच्या कलेवराचे 52 तुकडे केले, ही कथा आहे. ते भूमीवर जिथे जिथे पडले, ते सगळे शक्तिपीठं झाली. इथे या ठिकाणी सतीचा डावा डोळा पडला आणि त्या पाणीदार डोळ्याच्या आकाराचे सुंदर सरोवर तयार झाले. म्हणून हे नाव. नैनी=नयन-सरोवर=ताल. डोळ्याच्या आकाराचे सुरेख सरोवर म्हणून ‘नैनीताल.’ बाजूलाच नैनादेवीचे जुने सुरेख प्राचीन देऊळ आहे. रम्य परिसर! त्याभोवताल मग वस्ती जमत गेली तेच हे नैनीताल गाव!
 

 
 
उत्तरांचलमधील एक नावीन्यपूर्ण पर्यटनस्थळ. आज अनेक देशी-विदेशी पर्यटकांची विशेष पसंती आहे. केव्हाही गर्दी असतेच. पण, हवामान अति आनंददायी असल्याने जाणवत नाही. या तालात नौकाविहार करणे, हा आनंद काही औरच आहे. विविध आकाराच्या शेकडो नावा सजूनसवरून सरोवरात वावरतानाचे दृश्य विलोभनीयच असते.
 
आमच्या निवासाच्या जागेला- ‘सनसेट स्वीट होम’ असं सार्थक नाव ठेवलं होतं. सूर्यास्ताचे दृश्य कुठेही सुंदरच असते, पण इथले हे दृश्य कधीही विसरता येणे शक्य नाही, तेही खोलीच्या गॅलरीत बसून. अविस्मरणीय असा हा अनुभव होता. नैनीतालच्या आजूबाजूलाही खूपकाही बघण्यासारखं आहे. पूर्ण दिवस लागतो.
 
गावाजवळच निसर्गनिर्मित गुफा आहेत. त्यांच्या लहानमोठ्या आकारावरून त्यांना- टायगर केव्हस्‌, लिओपार्ड केव्हस्‌, बॅट केव्हस्‌, मोंका केव्हस्‌, फॉक्स केव्हस्‌ म्हणतात अशा 4-5 केव्हस्‌ आहेत. अवश्य अनुभव घ्यावा. बॉटनीकल गार्डन छानच आहे. हिमालयातील सगळ्या औषधिवनस्पती, फुलं, कंदमुळं इ.च्या सगळ्या माहितीसह झाडांचे संग्रह इथे आहेत. जवळच सुरेख फॉल्स आहेत. कितीही उन्हाळा असला तरी हे फॉल्स सुरूच असतात, अशी याची ख्याती आहे. हनुमान गढी, पायलटबाबा मंदिर, रोप-वे, झू इ. इतर आकर्षणं आहेतच.
 
बहुदा प्रत्येक उंचीवरील पर्यटन वा थंड हवेच्या गावात एक ‘मालरोड’ असतोच. इथेही आहे. नेहमीच विविध प्रकारच्या पर्यटकांनी गजबजलेला, मोठ्यमोठ्या दुकानांनी सजलेला, विजेच्या झगमगाटांनी फुललेला, फुटपाथ विक्रेत्यांनी वेढलेला, मालरोड हा जवळपास एक ते दीड किमीचा मार्ग नुसता मजेत फिरून, अनुभवावा असाच आहे. कुठे गरिबी असल्याचे जाणवतच नाही.
 
जन्या ऊत्तरप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री व या भागातील जुने गांधीवादी नेते भारतरत्न पं. गोविन्दवल्लभ पंत यांची छाप सगळीकडे दिसते. तळ्याच्या काठावरच अगदी मोक्याच्या जागी त्यांचा पूर्णाकृती पुतळा, याची साक्ष आहे. सगळीकडेच यांंचे नाव आदराने घेतले जाते. पंतनगर नावाचे त्यांचे गावही जवळच आहे.
 
नैनीतालच्या गावाच्या नगररचनेचे एक वैशिष्ट्य जाणवले. ते हे की, सगळं गांव पहाडीवर वसलेलं आहे, पण पहाडीच्या फक्त एकाच बाजूने ज्या दिशेने सूर्यप्रकाश आणि किरणं घरात येऊ शकतील अशाच बाजूने वस्ती, वसाहत आहे. बाकी दुसरी बाजू अगदी रिकामी आहे. अगदी थंडगार! त्या बाजूचं नावच मुळी कोल्डझोन व कोल्डरोड असे आहे. विशेष वाटले.
 
आता उत्तराखंडमध्ये असले तरी नैनीताल, रानीखेत, कौसानी ही स्थळं आपलं वेगळं स्थान, जुन्या उत्तरप्रदेशातही सांभाळून होती. त्यांची सविस्तर माहिती आपण क्रमश: जाणून घेऊ.
 
नैनीतालसाठी दिल्लीमार्गे जाणे सोयीचे ठरावे. विमान, रेल्वे वा सडकमार्गे दिल्ली- नंतर सडकमार्गे नैनीतालला सहज पोहोचता येते. प्राकृतिक सौंदर्य अनुभवण्यासाठी फक्त काश्मीर हा पर्याय आता मागे पडला आहे.