विभाजनाची रेषा असलेले अटारी...

    दिनांक :11-Jun-2019
•संजय गोखले
9422810501
 
8 जुलै 1947... सर सिरिल रेडक्लिफ पहिल्यांदाच भारतात आला. अखंड भारतावर विभाजनाच्या दोन रेषा ओढण्याची जबाबदारी त्याला सोपवण्यात आली होती. अखंड भारताच्या भौगोलिक, सांप्रदायिक आणि सामाजिक स्थितीचा अभ्यास नसलेल्या व्यक्तीला भारताचे तीन तुकडे करण्यासाठी फक्त पाच आठवड्यांचा अवधी देण्यात आला. अखंड भारतातल्या पंजाब आणि बंगालच्या नागरिकांनी भविष्यात भारताचे नागरिक असावे किंवा पाकिस्तानचे नागरिक असावे, हा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न रेडक्लिफ याने नकाशावर ओढलेली रेष ठरवणार होती आणि 15 ऑगस्ट 1947 च्या काही दिवसांआधी रेडक्लिफने ती रेष नकाशावर ओढली. या विभाजनरेषेने नागरिकांचे जगातले सर्वात मोठे विस्थापन आणि रक्तपात घडवला. भारताच्या कपाळी ओढलेली ही रेडक्लिफ विभाजनरेखा पंजाबच्या अटारी गावापासून फक्त 3 कि.मी. अंतरावर आहे, त्या सीमेला आज आपण वाघा बॉर्डर म्हणून ओळखतो. वाघा हे अटारी गावापासून 4 किमी अंतरावर असलेले पाकिस्तानमध्ये असलेले गाव आहे. वास्तविक पाहता, या बॉर्डरचे नाव वाघा बॉर्डर नसून अटारी बॉर्डर असायला हवे.
 
 
अमृतसरचे स्वर्णमंदिर आणि जालियांवाला बाग बघून पर्यटक वाघा बॉर्डरवर सूर्यास्ताच्या आधी होणार्‍या बीिंटग रिट्रीट परेडला बघण्यासाठी येतात. भारत आणि पाकिस्तानचे राष्ट्रध्वज एकाच वेळी उतरविण्यात येतात आणि मोठा आवेश आणून सीमेवरचे गेट बंद करण्यात येते. समारोह संपल्यावर पर्यटक अमृतसरकडे परतात. सीमेवरून फक्त 3 कि.मी. अंतर असलेले भारताचे शेवटचे रेल्वेस्टेशन अटारी पर्यटकांची वाट बघत असते.
 
अटारी स्टेशनवर अनुभवण्यासारखे बरेच काही, पण बघण्यासारखे वेगळे काही नाही. ब्रिटिश काळातली बैठी इमारत असलेले स्टेशन आहे. पिवळ्या दगडी बोर्डवर देवनागरी, गुरुमुखी आणि इंग्रजी लिपीत ‘अटारी’ नाव कोरलेले आहे. फक्त दोन प्लॅटफार्म असलेले हे छोटे स्टेशन आहे. स्टेशनच्या निवांत जागेवर बाकावर बसावे आणि डोळे मिटून मनाच्या पटलावर उलगडणारा विलक्षण इतिहास अनुभवावा. सिंध-पंजाब-दिल्ली रेल्वेने मुलतान-लाहोर-अटारी-अमृतसर रेल्वेलाईन 1865 मध्ये टाकून पूर्ण केली. पेशावर-दिल्ली ट्रेन सुरू झाल्या. 1 सप्टेंबर 1928 ला कुलाबा (मुंबई) ते पेशावर मार्गावर फ्रंटियर मेल ही ऐतिहासिक ट्रेन सुरू झाली. त्या काळातील ही सर्वाधिक प्रतिष्ठित ट्रेन होती. मुुंबई आणि कराचीचे मोठे व्यापारी, ब्रिटिश अधिकारी या ट्रेनने प्रवास करायचे. डब्यांना थंड ठेवण्यासाठी लोरिंगच्या खालच्या पोकळीत बर्फाच्या लाद्या ठेवल्या जायच्या.
 
मिनिटागणिक राईट टाईमवर चालण्यासाठी ही ट्रेन प्रसिद्ध होती. या ट्रेनच्या धावण्याच्या वेळेवरून लोक घड्याळ सेट करायचे. फक्त एकदा ही ट्रेन 15 मिनिटे उशिरा धावली म्हणून इनक्वॉयरी कमिशन बसविण्यात आले होते. ही ट्रेन आजही मुंबई-अमृतसर मार्गावर स्वर्णमंदिर एक्सप्रेस नावाने धावते. पेशावर मंगलोर 4000 कि.मी. आणि 104 तासांचा प्रवास असणारी ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 1929 मध्ये सुरू झाली. अटारीचे स्टेशन हे वैभव आनंदाने अनुभवत होते, या आनंदाला ऑगस्ट 1947 मध्ये दृष्ट लागली. देशाचे विभाजन झाले. या विभाजनाने 9 कोटी लोक प्रभवित झाले. 15 लाख नागरिकांनी स्थलांतरण केले, उसळलेल्या दंग्यांमध्ये 1 लाखाच्या वर लोक मारले गेले.
 
भारताकडे जाणार्‍या ट्रेनवर पाकिस्तानमध्ये हल्ले झाले. याच अटारी स्टेशनने मृतदेहांनी भरलेली ट्रेन प्लेटफॉर्मवर आल्याचे अनेक दु:खद प्रसंग अनुभवले आहेत. येणार्‍या प्रवाशांना शिख समाजसेवक अन्न आणि पाणी वाटण्यासाठी अटारी स्टेशनवर यायचे, परंतु त्यांना छिन्नविच्छिन्न झालेल्या, शेवटची घटका मोजणार्‍या मानव देहांच्या तोंडात पाणी सोडून निरोप द्यावा लागायचा... त्या काळच्या प्रत्यक्षदर्शीने ट्रेनच्या डब्यातून वाहणारे रक्त आणि मानवी अवयव खाली रुळांवर पडताना बघितले आहेत. या दु:खद इतिहासाला विसरून 22 जुलै 1976 ला भारताने मोठ्या मनाने पुरानी दिल्ली ते लाहोर ही आठवड्यातून दोनदा धावणारी समझौता एक्सप्रेस ट्रेन सुरू केली.
 
अटारी स्टेशनचा 2 नंबर प्लॅटफॉर्म या ट्रेनसाठी आरक्षित आहे. ही ट्रेन येण्याच्या वेळेला प्लॅटफॉर्मवर कडक सुरक्षाव्यवस्था असते. व्हिसा आणि तिकीट दाखविल्यावरच प्लॅटफॉर्मवर जाता येते. अटारी स्टेशनपासून पाकिस्तानकडे जाणार्‍या रेल्वेमार्गावर 3 कि.मी. अंतरावर पाकिस्तान सीमेवर गेट लावले आहे. अटारी स्टेशन ते सीमेवरचे गेट या रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूंना काटेरी कुंपण आहे. पाकिस्तानकडून जेव्हा ट्रेन येते तेव्हा हे गेट उघडून ट्रेनला प्रवेश देण्यात येतो. गेटपासून अटारीपर्यंत घोड्यावर स्वार असलेले सैनिक ट्रेनच्या दोन्ही बाजूने ट्रेनच्या सोबत धावतात. चालत्या ट्रेनमधून अनधिकृत प्रवासी किंवा आतंकवादी उतरून जाऊ नयेत म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे. अटारी स्टेशनवर या प्रवाशांचे कागदपत्रं आणि सामानाची पूर्ण तपासणी होते.
 
या स्टेशनचे नवीन नाव श्यामिंसग अटारीवालाच्या नावावरून अटारी श्यामिंसग ठेवण्यात आले आहे. अटारी गावाचे रहिवासी सरदार श्यामिंसग महाराजा रणजीत िंसहच्या सेनेचे सेनापती होते. अफगाणिस्तानच्या अफगाण-शिख युद्धात, मुल्तानच्या युद्धात आणि अटकच्या युद्धात त्यांनी मोठा पराक्रम गाजवला होता. 1846 मध्ये त्यांना वीरमरण आले. मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह हत्तीवर बसवून अटारी गावात आणण्यात आला होता.
 
बाकावर बसून इतिहास मनात घोळवत बराच वेळ झाला होता. प्लेटफॉर्मवरून खाली लोहमार्गावर उतरलो. पश्चिमेस सूर्यास्त होणार होता. त्याच्या तांबूस प्रकाशात पाकिस्तानकडे जाणारे रूळ लाल रंग परावर्तित करत होते. मानवी रक्ताचा लाल रंग...