बंगालचा गुजरात करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु : ममता बॅनर्जी

    दिनांक :11-Jun-2019
कोलकाता,
पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रपती शासन लागू करण्याची तयारी केंद्रात सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. त्यातच आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला असून, बंगालचा गुजरात करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होत असल्याचे आरोप ममतांनी केले आहे. राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेल्या भेटीवर त्या आपली प्रतिकिया देतांना बोलत होत्या.
 
 
लोकसभा निवडणुकीत सुरू झालेले भाजप आणि ममता यांच्यातील राजकीय युद्ध थांबायला तयार नाही. त्यात सत्तेत आलेला भाजप ही आक्रमक होताना दिसत आहे. त्यातच,पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी शहा आणि मोदींची भेट घेतल्यानंतर बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची चर्चा सुरु आहे. त्यावरून ममतांनी भाजपचा समाचार घेतला आहे. राज्यपाल त्रिपाठी यांचा मी आदर करते, मात्र प्रत्येक पदाची संवैधानिक मर्यादा असते. बंगाल राज्याला दुसरे गुजरात बनवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. मात्र बंगाल हे गुजरात होऊ शकत नाही. असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
 
 
समाजसेवक विद्यासागर यांचा पुतळा कुणी तोडला हे मला माहित आहे. आता ते गृहमंत्री झाले आहे, असे म्हणत ममतांनी अमित शहा यांच्यावर निशाना साधला. पश्चिम बंगालमध्ये सत्तेत येण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसला ३४ वर्षे लागली. मात्र या काळात आम्ही कधीच कोणतेही पुतळे तोडले नाही, असेही ममता म्हणाल्या.