अमरावती : ३ हजार ७०० किलो बनावट खत जप्त

    दिनांक :11-Jun-2019
कृषी विभागाची कारवाई
 
अमरावती: खरीपचा हंगाम लवकरच सुरू होणार असल्याने बाजारात खत व बियाण्यांची आवक वाढायला लागली आहे. मागणी लक्षात घेऊन बनावट खत व बियाण्यांची आवकही बाजारात होत असून कृषी विभागाने वरुड तालुक्यातल्या ग्राम फत्तेपुर येथे धडक कारवाई करून ३ हजार ७०० किलो बनावट खताचा साठा व दोन चारचाकी वाहन जप्त केले आहे.
 

 
 
 
वरुड येथील तालुका कृषी अधिकारी व खत निरीक्षक उज्ज्वल आगरकर यांना ग्राम फत्तेपुर येथील जिल्हा परिषद शाळे समोर बनावट खत दोन वाहनांमध्ये आले असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर ते वरुड पंचायत समितीचे खत निरीक्षक व कृषी अधिकारी राजकुमार सावळे यांना सोबत घेऊन सोमवारी रात्री ग्राम फत्तेपुर येथे पोहचले. त्यांना कंपनी प्रतिनिधी निलकांत ढबाले (वय ३३, रा. जलालखेडा, ता. नरखेड) यांच्या ताब्यातील एम. एच. २७ एक्स ७६६२ क्रमांकाच्या बोलेरो व एम. एच. १२ एल. टी. ९९८९ क्रमांकाच्या आयशर गाडीत नवरत्न नावाच्या खताचा २५०० किलो, शक्तिमान नावाच्या खताचा ६०० किलो, चमत्कार नावाच्या खताचा ६०० किलो असा एकूण ३ हजार ७०० किलो साठा आढळून आला. त्याचे बाजारमूल्य १ लाख २७ हजार ४०० आहे. तपासणी केल्यावर संशय आल्याने उपरोक्त दोनही अधिकाऱ्यांनी ढबाळे यांच्याकडे परवानगीच्या कागदपत्रांची मागणी केली. ढबाळे यांनी कोणतेच कागदपत्रे दिले नाही. त्यामुळे हे खत विनापरवानगीने उत्पादित करून विक्री करण्यात येत असल्याचे सिध्द झाले. खताचा पंचनामा करून दोनही वाहने जप्त करण्यात आली. ही कायदेशीर कारवाई सुरू असताना ढबाळे तेथून पसार झाला. सर्व प्रक्रिया आटोपल्यावर नीलकांत ढबाळे व मारोती इंडस्ट्रीज परमल कासा, मायक्रो बायोटेक नागपूर या कंपनी मालका विरुद्ध वरुड पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरुड पोलिस करीत आहे.