‘चांद्रयान-2’चा मुहूर्त 9 जुलै!

    दिनांक :11-Jun-2019
- इस्रोची तयारी सुरू
नवी दिल्ली,
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात्‌ इस्रोने आपल्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेकरिता 9 जुलै हा मुहूर्त निश्चित केला आहे. तामिळनाडूच्या महेंद्रगिरी आणि बंगळुरूच्या ब्यालालू येथे या मोहिमेची चाचणी अंतिम टप्प्यात आहे.
 
 
 
या मोहिमेवर जाणारे अंतराळयान 19 जून रोजी बंगळुरू येथून रवाना होईल आणि 20 किंवा 21 जून रोजी ते श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावर पोहोचेल. त्यानंतर हे अंतराळयान चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले जाईल, अशी माहिती इस्रोच्या अधिकार्‍याने दिली.
  
ही मोहीम यशस्वी ठरल्यास, थ्रीडी मॅिंपगच्या माध्यमातून चंद्रावरील पाण्याच्या रेणूंची व खनिजांची तपासणी, तसेच जिथे आजवर कुणीही पोहोचले नाही, अशा चंद्राच्या बाजूवर यान उतरवण्यासाठी इस्रोने मोठी तयारी केली आहे. मात्र, या महत्त्वाकांक्षी मोहिमेपुढे अनेक आव्हानेही आहेत, असे इस्रोतील अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. पृथ्वीपासून चंद्राचे अंतर 3,844 लाख किलोमीटर आहे.
 
संवाद साधताना होणारा उशीर या मोहिमेतील एक मोठी समस्या आहे. पृथ्वीवरून कोणताही संदेश पाठवला, तर तो यानापर्यंत पोहोचताना काही मिनिटे लागू शकतात. त्याठिकाणी संदेशासाठीचे रेडिओ सिग्नल्स कमजोर असू शकतात. या संवादादरम्यान होणारा वातावरणाचा आवाजही यावर परिणाम करू शकतो, असेही वृत्तात म्हटले आहे.