बेनामी मालमत्ता जाहीर करा: इम्रान खान

    दिनांक :11-Jun-2019
इस्लामाबाद,
आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानला पुन्हा मजबूत राष्ट्र बनविण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 'मालमत्ता घोषणा योजना' लागू केली असून, बेनामी मालमत्ता येत्या ३० जूनपर्यंत जाहीर करण्याचे आणि वेळेत कर भरण्याचे आवाहन पाकिस्तानी नागरिकांना केले आहे. ३० जूनपर्यंत मालमत्ता घोषित न केल्या कायदेशीर कारवाई केली जाईल, असा आदेशवजा इशाराही खान यांनी सोमवारी दिला आहे. पाकिस्तानचे २०१९-२०चे वार्षिक बजेट आज, मंगळवारी सादर होणार असून, देशाला संबोधताना इम्रान खान यांनी ही घोषणा केली.
 
 
खान या वेळी बोलताना म्हणाले, 'पाकिस्तानला सामर्थ्यवान देश बनवायचे असेल तर आपल्याला स्वत:मध्ये बदल करायला हवेत. त्यामुळे मी सर्व देशाला आवाहन करतो, की देशासाठी लागू करण्यात आलेल्या 'मालमत्ता घोषणापत्र योजने'मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. जर आपण नियमितपणे कर भरला नाही, तर आपल्या देशाची आर्थिकदृष्ट्या प्रगती होऊ शकणार नाही. त्यासाठी ३० जूनपर्यंत प्रत्येकाने आपली बेनामी मालमत्ता, बेनामी बँक खाते आणि जो पैसा परदेशातील बँकेत ठेवला आहे तो जाहीर करावा,' अशी विनंती त्यांनी केली. '३० जूननंतर मालमत्ता जाहीर करण्याची संधी मिळणार नाही. आपल्या एजन्सीजना कोणाची कोणती बेनामी मालमत्ता आहे, किती आहे, याची माहिती आहे,' असेही त्यांनी सांगितले.