कैलास मानसरोवर यात्रेला प्रारंभ

    दिनांक :11-Jun-2019
- जयशंकर यांची घोषणा
नवी दिल्ली,
वार्षिक कैलास मानसरोवर यात्रेला आज मंगळवारपासून औपचारिक प्रारंभ झाला असल्याची घोषणा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी आज केली. लिपुलेख मार्गाने या यात्रेला सुरुवात झाली आहे. ही यात्रा भारत आणि चीन यांच्यातील मैत्री व सहकार्याचे संबंध आणखी बळकट करण्यासोबतच, दोन्ही देशांमधील नागरिकांमध्ये संवादाला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे, असे जयशंकर यांनी जवाहरलाल नेहरू भवनात यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले.
 
 
 
चीनमधील भारताचा राजदूत म्हणून मी कार्यरत असताना, मानसरोवर यात्रेला गेलो होतो. त्यामुळे या यात्रेचे महत्त्व मला माहिती आहे, असे सांगताना जयशंकर यांनी या यात्रेतील आपला अनुभवही विशद केला. 1981 पासून ही यात्रा सुरू झाली. तेव्हापासून सातत्याने भाविकांच्या मनात या यात्रेविषयीची आवडही वाढत आहे. या यात्रेच्या काळात उत्तराखंड, सिक्कीम आणि दिल्ली सरकारकडून वेळोवेळी सहकार्य प्राप्त झाले आहे, याशिवाय चीननेही प्रत्येक वर्षी आवश्यक ते सहकार्य दिले आहे, असा उल्लेखही त्यांनी यावेळी आवर्जुन केला.