एका खेपेपोटी सचिनला मिळायचे २५ हजार: दारू तस्कर पोलिसशिपाई प्रकरण

    दिनांक :11-Jun-2019
नागपूर: दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करी करण्याच्या प्रयत्नात अडकलेल्या नागपूर शहर पोलिस दलातील वाहतूक शाखेचा शिपाई सचिन हांडे यास एका खेपेपोटी २५ हजार रुपये मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
 
सचिन हांडे हा मुळचा भद्रावती (जि. चंद्रपूर) येथील राहणारा आहे. नागपूर शहर पोलिस दलातील सीताबर्डी वाहतूक शाखेत तो तैनातीस आहे. घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी त्याने ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह पथकात ड्युटी केली होती. महाराजबाग रोडवर राबविलेल्या ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह मोहिमेत तो सहभागी होता. रात्री दीड वाजेपर्यंत तो ड्युटीवर होता. त्यानंतर सकाळीच तो प्रणय म्हैसकर याच्यासह दारूची खेप घेऊन चंद्रपूरला गेला होता. पहाटेच्या वेळी रस्त्यावर पोलिस नसल्याचे पाहून त्याने ही हिंमत  केली होती. मात्र, त्यादिवशी त्याचे नशीब फुटले आणि तो वरोरा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. वरोरा पोलिसांनी नंदोरी टोल नाक्याजवळ त्याची कार अडविली.  सचिन हा पोलिस गणवेशातच कार घेऊन भद्रावतीकडे गेला होता. पोलिस गणवेशात असल्याने आपल्याला कुणीही अडवणार नाही असा त्याचा समज होता. परंतु, त्याचा हा समज खोटा ठरला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सचिनची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी देखील त्याने अनेकदा दारूची तस्करी केली होती अशीही माहिती आहे. आठवड्यातून दोनदा भद्रावती येथे माल पोहचवून देत होता अशीही माहिती आहे.
 
ती कार प्रणवच्या आईची
दारू तस्करीत अडकलेली एमएच ३१ ईयू ४८७३ क्रमांकाची कार ही प्रणय म्हैसकर याच्या आईच्या नावावर आहे. प्रणय हा सुशिक्षित कुटुंबातील असून त्याचे काका पुणे येथे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. वरोरा पोलिसांनी सचिन आणि प्रणय यांना पकडल्यानंतर कारवाई न करण्यासाठी वरोरा पोलिसांवर दडपण आणण्यात आले होते. हे प्रकरण तेथेच मिटणार होते. परंतु, स्थानिक पत्रकारांना या प्रकरणाची भनक लागल्याने ही तडजोड फिस्कटली अशीही चर्चा आहे.
 
सचिनला कुणाचा आशीर्वाद
सचिन हा ड्युटीवर असताना दारूची खेप घेऊन चंद्रपूरला गेला होता. ड्युटीवर असताना तो चंद्रपूरला गेलाच कसा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. बाहेरगावी जाण्यासाठी त्याने कुणाची परवानगी घेतली होती काय? असाही प्रश्न आहे. चंद्रपूरला जाण्यासाठी सचिनला कुणी परवानगी दिली त्याचीही चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.