नव्या मंत्रिपरिषदेची पहिली बैठक उद्या

    दिनांक :11-Jun-2019
- पंतप्रधान मोदी करणार मार्गदर्शन
नवी दिल्ली,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिपरिषदेची पहिली बैठक उद्या बुधवारी बोलावण्यात आली आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी मंत्र्यांना मार्गदर्शन करतानाच, या सरकारमध्ये त्यांची भूमिका काय असेल, याची कल्पना देणार असून सरकारच्या आगामी पाच वर्षांतील कामांची माहिती ते मंत्र्यांना देणार आहेत.
 

 
 
विशेषत: राज्य मंत्री आणि स्वतंत्र पदभार असलेल्या मंत्र्यांची भूमिका काय असेल, याबाबतची माहिती देण्यासोबतच, केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या विभागातील कनिष्ठ मंत्र्यांना जास्तीतजास्त कामे द्यावी, अशा सूचनाही ते करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
सरकारने आगामी पाच वर्षांकरिता ज्या योजना आणि कार्यक्रम निर्धारित केले आहेत, त्यावरही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. सरकारच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणत्या कल्याणकारी योजना आहेत आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासोबतच, जनतेला त्याबाबत माहिती कशी द्यायची, यावरही पंतप्रधान आपल्या मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
 
उद्या कॅबिनेटचीही बैठक
मंत्रिपरिषदेच्या बैठकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत मोदी सरकारने शेतकर्‍यांना वार्षिक सहा रुपये मदत देणार्‍या योजनेचा विस्तार करताना, ती देशभरातील शेतकर्‍यांना लागू केली होती.