#ICCWorldCup2019 : धवनच्या जागी ऋषभ पंतला संधी?

    दिनांक :11-Jun-2019
मुंबई,
आयसीसी विश्वचषकात दणकेबाज विजयी सुरुवात करणार्‍या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला रविवारी जबरदस्त हादरा बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झंझावती शतक झळकावणार्‍या डावखुरा सलामी फलंदाज शिखर धवन याच्या डाव्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली असून तो विश्वचषकाच्या बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागी संघात दिल्लीचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याच्या निवडीची शक्यता असून तो 24 तासात इंगलंडकडे रवाना होऊ शकतो. 

 
 
रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ऐन मोक्याच्या क्षणी शिखर धवनला सूर गवसला होता व त्याने भारताला साडेतिनशेपार धावांचा टप्पा गाठून देण्यात मोलाची मदत केली, मात्र धवनच्या या शतकी खेळी दरम्यान पॅट कमिन्सचा चेंडू त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर आदळला. मंगळवारी स्कॅनिंग केले असता त्याचा अंगठा गंभीररित्या फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी त्याला किमान तीन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या दुखापतीमुळेच शिखर क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. त्याच्याजागी बदली खेळाडू म्हणून रवींद्र जडेजा क्षेत्ररक्षणासाठी आला होता.
 
तीन आठवड्यांची विश्रांती सांगितल्यामुळे धवन आता किमान बांगलादेश (2 जुलै) किंवा त्यानंतरच्या श्रीलंका (6 जुलै) विरुद्धच्या सामन्यापर्यंत उपलब्ध राहणार नाही. अर्थात त्याला न्यूझीलंड (13 जून) व पाकिस्तानविरुद्धच्या (16 जून) सामन्याला मुकावे लागणार आहे.
 
धवनच्या या अवांच्छित दुखापतीमुळे आता पर्याय म्हणून दिल्लीचा धडाकेबाज यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याची निवड होऊ शकते. दिनेश कार्तिकमुळे विश्वचषक संघात स्थान मिळविण्यात अपयशी ठरला होता. आता हाच ऋषभ पंत 24 तासाच्या आत झटपट बॅग भरून इंग्लंडकडे रवाना होऊ शकतोे.