दुष्काळामुळे राज्यात उसाच्या उत्पादनात होणार घट !

    दिनांक :11-Jun-2019
पुणे : यंदाच्या उन्हाळ्यात  राज्यातील अनेक भागात दुष्काळाने परिसीमा गाठली आहे. या दुष्काळाचा परिणाम उसाच्या उत्पन्नावर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी ऊस गाळप हंगामासाठी तब्बल पावणे चारशे लाख टन ऊस गाळपासाठी कमी उपलब्ध होईल. त्यामुळे साखर उत्पादनात ६५ लाख टनापर्यंत घट होऊ शकते. म्हणजेच नुकत्याच संपलेल्या हंगामापेक्षासाखरेच्या उत्पादनात ४२ लाख टनांची घट होईल, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
 
 
 
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आगामी ऊस हंगामाचा अंदाज आणि नुकत्याच संपलेल्या हंगामाची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. गेले दोन हंगाम राज्यात विक्रमी साखर उत्पादन होत आहे. राज्यात २०१७-१८ या हंगामात ९५२.६० लाख टन ऊस गाळपातून विक्रमी १०७.१० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा ९५२.११ लाख टन ऊस गाळपातून १०७.२० लाख टन साखर उत्पादित करुन गेल्या वेळचा विक्रम मोडला गेला. गेल्यावर्षी शेवटच्या टप्प्यात फारसा पाऊस झाला नाही. तसेच, परतीच्या पावसाने पाठ फिरविली असून, वळवाचा पाऊस देखील झाला नाही. त्यामुळे चाऱ्यासाठी  मोठ्या प्रमाणावर ऊस जात आहे. अद्यापही राज्यात मॉन्सून सक्रीय झालेला नसल्याने चाऱ्यासाठी आणखी ऊस तोडला जाऊ शकतो.
दुष्काळी स्थितीमुळे राज्यात २०१९-२० या हंगामासाठी ५७० लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल. राज्याचा सरासरी साखर उतारा साडेअकरा टक्का आहे. त्यामुळे यंदा ६४.४१ लाख टन साखर उत्पादनाचा प्राथमिक अंदाज आहे. यानंतर पडणारा पाऊस, चाऱ्यासाठी झालेली तोड याचा विचार करुन पुढील अंदाज जुलै-ऑगस्टमधे वर्तविण्यात येऊ शकतो.