गुणग्राहक अभिनेत्याचा अंत...

    दिनांक :11-Jun-2019
तिसरा डोळा  
 
 चारुदत्त कहू 
 
मृत्यू अटळ आहे. तो कुणालाही टाळता येणे शक्य नाही. एखादी व्यक्ती प्रचंड लोकप्रिय आहे म्हणून तिला मृत्यूच नाही, असे शक्य नाही. याच न्यायाने ज्येष्ठ लेखक, अभिनेते, पत्रकार, नाटककार, पद्मश्री आणि पद्मभूषणचे मानकरी तसेच ज्ञानपीठ विजेते कलावंत गिरीश कर्नाड यांचा वयाच्या 81 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने मृत्यू झाला. दबक्या पावलाने आलेल्या मृत्यूने नाट्य, साहित्य आणि चित्रपटक्षेत्र गाजवणार्‍या या कलाकाराचे प्राणपाखरू उडवून नेले. एका चळवळ्या, नव्यांना मार्गदर्शक ठरणार्‍या आणि अनुभवी कलाकारांनाही दिशादर्शन करणार्‍या अभिव्यक्तीच्या निधनाने या क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.
 
 
 
 
19 मे 1938 रोजी महाराष्ट्रातील माथेरान येथे गिरीश कर्नाड यांचा जन्म झाला. बहुचर्चित रचनात्मक लेखक आणि कलाकारांपैकी जागरूक आणि आपल्या मतांबाबत आग्रही व्यक्ती, अशी त्यांची ओळख होती. उंचपुरी शरीरयष्टी, गोरागोमटा चेहरा, भाषेवरील प्रभुत्व, भेदक नजर, समोरच्या व्यक्तीला आपले मुद्दे पटवून सांगण्याचे कसब, गुणग्राहकता आणि सातत्याने नवकल्पनांची धरलेली कास, यामुळे कलेच्याच नव्हे, तर इतर क्षेत्रातही त्यांच्याकडे माणसं लोहचुंबकाप्रमाणे आकर्षित होत.
शालेय जीवनापासूनच त्यांचा नाटकांशी आलेला संबंध त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवला. सारे आयुष्यच ते अभिनय म्हणून जगले. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन कर्नाड प्रथम श्रेणीत बी. ए. उत्तीर्ण झाले. त्यावेळेस बालगंधर्व, किर्लोस्कर या नाटक कंपन्यांच्या नाटकांचे त्यांच्यावर संस्कार झाले. पदवीनंतर ते लंडनला गेले. त्यांचे उच्च शिक्षण िंलकन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले. कर्नाड हे शिकागो विद्यापीठाचे हंगामी प्राध्यापक होते. भारतात परतल्यानंतर त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या नाटकांनी भारतात व परदेशात बरेच नाव कमावले.
सर्वसामान्यांना ज्या सेलेब्रिटींबद्दल सतत आकर्षण असते, ज्यांच्या सहवासासाठी ते अक्षरशः आसुसले असतात अशा लोकांचा गिरीश कर्नाड यांना सातत्याने सहवास लाभला आणि त्यांच्या सहवासाने त्यांच्या प्रतिभेला घुमारे फुटले. त्यांची नाटकं इब्राहिम अलकाजी, बी. व्ही. कारंथ, आलोक पद्मसी, अरिंवद गौड, सत्यदेव दुबे, विजया मेहता, श्यामानंद जालान, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार आणि अमल अल्लानासारख्या थिएटर आणि रंगमंचावर गाजलेल्या प्रतिष्ठित दिग्दर्शकांनी निर्देशित केली, वाखाणली, यातच त्यांचे मोठेपण लपले आहे. प्रारंभीच्या काळात त्यांच्या नाटकांना चाहते मिळत नव्हते, हे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रातच नमूद केले आहे. त्यांचे पहिले नाटक 1961 ला, इंग्रजीत किंवा त्यांची मातृभाषा कोकणीत नव्हे, तर ते त्यांनी कन्नड भाषेत लिहिले. महाभारतातील पौराणिक पात्रांच्या साहसांचे वर्णन करणार्‍या त्यांच्या नाटकाला झटपट यश प्राप्त झाले आणि त्याचा इतर अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवादही केला गेला. ययाति, तुघलक, हयवदन ही त्यांनी लिहिलेली कन्नड नाटकं प्रचंड गाजली.
सत्यजित रे यांचे चित्रपट पाहून गिरीश कर्नाड प्रभावित झाले आणि त्यांनी सिनेमाकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘कानुरू हेगाडीथी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेे, तर ‘इक्बाल’ आणि ‘लाईफ गोज ऑन’, ‘एक था टायगर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलेे. त्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. त्यापैकी तीन पुरस्कार कन्नड चित्रपट वंश वृक्ष, काडू, ओन्दानुंडू कालाडल्ली या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी आणि ‘गोधुली’ या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी मिळाला आहे. कर्नाड यांनी संस्कार या प्रायोगिक चित्रपटातही काम केले. नंतर त्यांनी बर्‍याच कन्नड आणि िंहदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांचे ‘तब्बलियू नीनादे मगने’ व ‘ओन्दानुंडू कालादल्ली’ हे काही प्रसिद्ध कन्नड चित्रपट आणि उत्सव आणि गोधुली हे िंहदी चित्रपट आहेत. स्मिता पाटील यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘उंबरठा’ या मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले. त्यांचा कानुरू हेग्गदिती हा, कुवेंपू यांच्या कादंबरीवर आधारित कन्नड चित्रपटही नावाजला गेला आहे.
गिरीश कर्नाड, कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि नाट्य अकादमीचे सभापती होते. त्यांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेटने आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने डी. लिट. या पदवीने सन्मानित केले आहे. त्यांनी छोट्या पडद्यावरही महत्त्वपूर्ण कार्यक्रम आणि ‘सुराजनामा’ ही मालिका सादर केली. त्यांचे ‘तुघलक’ हे नाटक इतर सामान्य नाटकांपेक्षा अतिशय भिन्न होते. ज्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीदेखील मिळाली.
गिरीश कर्नाड यांनी ‘आडाडता आयुष्य’ (खेळता खेळता आयुष्य) या नावाने कानडी भाषेत आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचे उमा कुलकर्णी यांनी, ‘घडले कसे’ या नावाने केलेले मराठी भाषांतर राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. त्यातले कथानक आई-वडिलांचा वादग्रस्त विवाह, या घटनेपासून सुरू होऊन स्वतःच्या लग्नापाशी थांबते. यात त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा आरसाच चाहत्यांना दाखविला आहे, जो अनेकांना प्रेरणा देणारा ठरावा.
अभिनय, नाटक, लेखन अशा विविध क्षेत्रात छाप पाडतानाच राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर परखड मत व्यक्त करणारे कलावंत म्हणूनही ते ओळखले जायचे. गिरीश कर्नाड यांच्या निधनाने कलाक्षेत्रात शोककळा पसरली आहे. नागपूर शहरात गिरीश कर्नाड यांनी दोनदा भेटी दिल्या. या दोन्ही भेटी वृत्तपत्रांनी चांगल्याच गाजवल्या. वि. सा. संघातर्फे झालेल्या त्यांच्या सत्काराच्या आणि मुलाखतीच्या कार्यक्रमाला माध्यमांनी भरपूर प्रसिद्धी दिली. मुलाखतकार अजेय गंपावार यांनी त्यांना चांगलेच बोलते केले.
एक कलाकार म्हणून गिरीश कर्नाड यांचे श्रेष्ठत्व नाकारण्यासारखे नाहीच. त्यांनी या क्षेत्रात जो मैलाचा दगड गाठला आहे, तो ओलांडणे पुढच्या पिढीला कदाचित शक्यही होणार नाही. पण, सामाजिक भाष्यासाठी आग्रही असलेल्या कर्नाड यांच्या काही भूमिका, वक्तव्ये टीकसेही पात्र ठरली. स्त्री-पुरुष संबंधांबाबतची त्यांची मतं पचवण्यास अवघड गेली. व्यक्तिस्वातंत्र्याबाबतच्या त्यांच्या भूमिकाही िंहदुत्ववाद्यांना नाराज करून गेल्या. डाव्या विचारांचा त्यांनी आयुष्यभर पुरस्कार केला आणि त्या भूमिका जोपासताना िंहदू धर्म, संस्कृती, देशीवाद, भारतीय परंपरा यांच्यावर सातत्याने कोरडे ओढले. जे येथील बहुंसख्य जनतेने नाकारले आणि त्यातून त्यांच्या प्रतिभेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत गेले. बंगळुरू येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या मृत्यूच्या पहिल्या स्मृतिदिनी आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत कर्नाड ‘मी टू अर्बन नक्षल’ अशी पाटी गळ्यात अडकवून सहभागी झाले. डाव्यांच्या भूमिकेची पाठराखण करणारी त्यांची ही कृती टीकेस पात्र ठरली नसती तरच नवल. देशभरातील अर्बन नक्षल्यांना नजरकैदेत ठेवण्याच्या सरकारच्या कृतीविरुद्ध टीका करणेही त्यांच्या अंगलट आले. भैरप्पा यांच्या ‘आवरण’ या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या निघाल्याचे कारण काय, असा प्रश्न नागपुरातील एका माध्यम संवादात त्यांना विचारण्यात आला असता, त्यांनी सार्‍या संघवाल्यांनी ही पुस्तके खरेदी केल्याचे सांगून या लेखकाचे श्रेष्ठत्व नाकारले होते. कलबुर्गी, दाभोळकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्येपाठीमागे विशिष्ट विचारसरणीच असल्याचा त्यांनी धरलेला आग्रह डाव्यांशी असलेल्या त्यांच्या सलगीतूनच झालेला असल्याचेच नंतर स्पष्ट झाले. 2019च्या लोकसभेत द्वेषाचे राजकारण करणार्‍यांना नाकारा, असे पत्र लिहिणार्‍या लेखकांच्या समूहाचेही ते सोबती झाले. उजव्या विचारसरणीकडे डाव्यांच्या तुलनेत बुद्धिवाद्यांचा अभाव असल्याचे वक्तव्य करून, त्यांनी राजकीय वाद ओढवून घेतला. मॉबिंलिंचग, गोमांसभक्षण, व्ही. एस. नायपॉल आणि रवींद्रनाथ टागोरांच्या नाटकांबद्दलच्या त्यांच्या भूमिकाही टीकेस पात्र ठरल्या.
9922946774