वर्चस्वाच्या वादातून चमचमची हत्या

    दिनांक :11-Jun-2019
उपचारादरम्यान चमचमचा मृत्यू
उत्तमबाबावर खुनाचा गुन्हा दाखल
नागपूर: वर्चस्व आणि पैशाच्या वादातून तृतियपंथियांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चमचम प्रकाश गजभिये (२५) या तृतियपंथीचा सोमवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कळमना पोलिसांनी मुख्य आरोपी उत्तमबाबासह पाच आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
तृतीयंपथींयांचा गुरू उत्तमबाबा सेनापती (रा. कामनानगर) याने पैशाचा वाद आणि शहरात वर्चस्व राखण्यासाठी त्याचे साथीदार चट्टू ऊर्फ कमल अशोक उईके, किरण अशोक गवळी , सोनू पारशिवनीकर व शेख निसार शेख सादिक यांच्या मदतीने ४ जून रोजी चमचम गजभीये हिच्यावर चाकू, तलवार आणि सत्तूरने हल्ला केला होता. गंभीर जखमी चमचमला तिचा प्रियकर नौशाद आणि शिष्य राखी हिने कामठी मार्गावरील होप हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. घटनेच्या दिवशी चमचमवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तिची प्रकृती अत्यंत नाजूक होती. गेल्या दोन दिवसांपासून तिच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा होत होती. मात्र, आज सोमवारी ती बेशुद्ध असतानाच तिला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.
 
 
 
 
ऑटोचालक ते तृतियपंथी
तृतियपंथीयांचा गुरू म्हणून ओळखल्या जाणारा उत्तमबाबा हा पूर्वी ऑटो चालवायचा. काही वर्षांपूर्वी उत्तमने शहरातील तृतियपंथीयांना संघटित करून एक गट तयार केला. अनेक वर्षांपासून चमचम त्याच्या सोबत होती. उत्तमबाबासोबतच सर्व तृतियपंथीयांमध्ये चमचमची लोकप्रियता होती. त्यामुळे तृतियपंथीयांमध्ये चमचमलाही मान होता. उत्तमबाबा आणि चमचम स्वतंत्र विदर्भ आंदोलनातही सक्रिय होते आणि अनेक आंदोलन त्यांनी सोबत मिळून केले. उत्तमने कामनानगर येथील त्याच्या तीन माळ्यांच्या इमारतीत बाहेरून आलेल्या काही तृतियपंथीयांना आसरा दिला होता. दररोज सकाळी ९ वाजता शहरातील तृतियपंथी उत्तमच्या घरी जायचे. तेथून ढोलक घेऊन ऑटोमध्ये वेगवेगळ्या भागात जातात आणि लग्न, बारसे व इतर समारोहात गाणे-वाजवणे करून पैसे गोळा करायचे. गोळा झालेले सर्व पैसे दुपारी उत्तमच्या घरी जमा करण्यात येत होते.
चमचम आणि उत्तमबाबात बिनसले
काही दिवसांपूर्वी पैशावरून चमचमचा उत्तमबाबासोबत वाद झाला होता. चमचमचे उत्तमबाबाकडे पैसे होते. चमचमने पैशाची मागणी करूनही उत्तमबाबा पैसे देत नव्हता. त्यामुळे चमचम संतप्त झाली होती. तिने पैशासाठी तगादा लावला होता. त्यामुळे ४ जून रोजी उत्तमबाबाने चमचमला आपल्या घरी कामनानगर येथ बोलविले. पैशावरून वाद झाल्याने उत्तमबाबा व त्याच्या साथीदारांनी चमचम व तिच्या साथीदारांवर हल्ला केला.
उत्तम बाबा बनला गुन्हेगार
काही महिन्यांपूर्वी उत्तम बाबाने गुन्हेगारीकडे मोर्चा वळविला होता. पोलिस ठाण्यात वाद घालून त्याने चक्‍क एका पोलिस अधिकाèयावर पिस्तूल रोखले होते. त्याचप्रमाणे तृतियपंथियांना मारहाण करणे, धारदार शस्त्र बाळगणे, खंडणी वसूल करणे तसेच कुणाचे खाली प्लॉटवर कब्जा मारणे किंवा प्लॉट खाली करून देण्याचे कामही उत्तम सुपारी घेऊन करीत होता.
चमचमचा गट आक्रमक
उत्तमबाबा सेनापती हिच्या तोडीचा चमचमने आपला वेगळा गट तयार केला होता. पदवीधर असलेली चमचम ही हुशार होती. तसेच मनमिळावू स्वभावाची असल्यामुळे चमचमच्या गटात दीडेशहून अधिक तृतियपंथी सहभागी झाले होते. तर उत्तमबाबा याच्याकडे केवळ १५ शिष्य होते. त्यामुळे उत्तम बाबाला स्वतःचे गुरू पद गमविण्याची भीती होती. त्यातूनच चमचमचा काटा काढण्यात आला. मात्र, आता चमचमचा गट आक्रमक होण्याची शक्‍यता आहे.