चर्चगेट येथे होर्डिंग अंगावर पडून पादचारी ठार

    दिनांक :12-Jun-2019
चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ होर्डिंग अंगावर कोसळून एका ६२ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. मधुकर आप्पा नार्वेकर असं मृताचं नाव आहे. चर्चगेट रेल्वे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

आज दुपारी पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली. त्यात नार्वेकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चर्चगेट स्थानकाच्या इमारतीवर महात्मा गांधी यांचे १५ फूटी चित्र तयार करण्यात आले आहे. यातील ६ चौकोनी भाग खाली कोसळून दुर्घटना झाली.

स्थानकाच्या इमारतीवर ऑक्टोबर २०१७ रोजी रंगकाम पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ब्राझीलचा स्ट्रीक आर्टिस्ट एडुआर्डो कोबरा याने इमारतीवर महात्मा गांधी यांचे चित्र रेखाटले होते.
मुंबईच्या किनाऱ्यापासून काही मीटर अंतरावर 'वायू' चक्रीवादळ घोंगावत आहे. परिणामी मुंबईतील अनेक भागांत वाऱ्याचा जोर आहे. यातूनच महात्मा गांधी यांच्या चित्राचा काही भाग कोसळून ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता आहे.