ममता बॅनर्जींच्याविरोधात भाजपा कार्यकर्ते आक्रमक

    दिनांक :12-Jun-2019
कोलकाता,
लोकसभा निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार आणखीनच वाढला आहे. सत्तापक्ष तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. राज्यात गेल्या 24 तासांत तिघांच्या राजकीय हत्या झाल्या आहेत. त्यावरून तृणमूल काँग्रेस तसेच भाजपा हे एकमेकांवर आरोप करीत आहेत. 
 
 
दरम्यान, आज तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनादरम्यान जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. तसेच, यावेळी आक‘मक झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे येथील तणाव वाढला आहे.
 
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस व भाजपामध्ये सुरू असलेला हिंसक संघर्ष निवळण्याची चिन्हे नसून उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील कांकिनारा येथे सोमवारी रात्री गावठी बॉम्बच्या हल्ल्यात दोन जण ठार व तीन जण जखमी झाले. ते दोघे आमचे कार्यकर्ते असून, त्यांना भाजपाच्या गुंडांनी ठार मारल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांत हिंसाचारामध्ये ठार झालेल्या दहा जणांच्या वारसदारांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची भरपाई देण्याचे मु‘यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे.
 
दोन-तीन दिवसांपूर्वी भाजपा कार्यकर्ता आणि एका संघ स्वयंसेवकाची हत्या करून त्यांचे मृतदेह शेतातील झाडांना लटकविलेल्या स्थिती आढळून आले होते. तृणमूलच्या गुंडांचे हे कृत्य असल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला होता.