चारधाम यात्रेसाठी निघालेल्या बसला अपघात; ४ भाविक ठार

    दिनांक :12-Jun-2019
तभा ऑनलाईन टीम  
नाशिक,
नाशिकहून चारधामला निघालेल्या सर्वज्ञ यात्रा कंपनीच्या बसला काल रात्री 10 वाजताच्या सुमारास मध्यप्रदेशातील विदिशा जिल्ह्यात भीषण अपघात झाला. या अपघातात चार भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. 
 
 
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनीच बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
या बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते. उज्जैैनवरून चित्रकूटला जात असताना विदिशा-सागर रोडवरील एका अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. बसवरील नियंत्रण सुटल्यानंतर बस तीन वेळा उलटली. दरम्यान, ती बस रस्त्याजवळच्या नाल्यात पडता-पडता थोडक्यात वाचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
 
नाशिकमधील 50 भाविक 9 जून रोजी सर्वज्ञ यात्रा कंपनीच्या बसने एक महिन्याच्या तीर्थयात्रेसाठी निघाले होते. परंतु, यात्रेच्या चौथ्याच दिवशी बसला मोठा अपघात झाला.