अशी करा फुलशेती

    दिनांक :12-Jun-2019
आता शेतीमध्ये आधुनिकता आली असून अनेक शेतकर्‍यांनी शेतीला व्यावसायिक स्वरूप दिलं आहे. शेतीच्या अनेक शाखांमध्ये फुलशेतीचा नेहमी उल्लेख होतो. त्यादृष्टीने यशस्वी फुलशेतीबाबत शेतकर्‍यांनी काही बाबी लक्षात घ्याव्या. 

 
 
  1. शोभेच्या, फुलांच्या आणि कुंडीतील झाडांची अभिवृद्धी करून त्यापासून चांगला नफा कमवता येऊ शकतो. घर, कार्यालय, औद्योगिक कारखान्यांचा परिसर, शाळा, विद्यालये यांच्या सुशोभिकरणासाठी शोभेच्या झाडांची मागणी वाढत आहे. ऑर्किड, ॲन्थुरियम, शेवंती, कार्नेशन यासारख्या जास्त किंमतीच्या फुलांना देशात, परदेशात मागणी आहे. अशा फुलांची उति संवर्धनाद्वारे दर्जेदार रोपे तयार करूनही चांगला आर्थिक फायदा कमवता येऊ शकतो.
  2. डाळींब, जुनिपर, वड, पिंपळ, चिंच आदींची बोन्साय प्रकारातील झाडांची मागणी दरवर्षी वाढत आहे. अशा झाडांच्या कलाकृती करून चांगला व्यवसाय करता येऊ शकतो.
  3. दुकाने, कार्यालये, कॉर्पोरेट कंपन्या या ठिकाणी शोभेची झाडं भाड्याने देण्याची पध्दत चांगलीच रूढ होत आहे. हा व्यवसाय उत्तम प्राप्ती देणारा आहे.
  4. औद्योगिक परिसर, रस्ते, मोठ्या शहरातील नवीन वसाहती अशा ठिकाणी लॅण्डस्केपिंगची मागणी वाढत आहे. शोभेच्या आणि फुलांच्या झाडांची चांगली माहिती असणार्‍यांना लॅण्डस्केपिंगची कामे करता येऊ शकतात. त्यांची देखभालही विशिष्ट आर्थिक कराराद्वारे करता येते.
  5. कार्यालये, मोठ्या बंगल्यांमध्ये दर महिन्याच्या दराने फुलदाण्या दोन ते पाच दिवसांनी सजवण्याचा करार करता येतो. फुलांचे प्रकार आणि सजवण्याचा कालावधी यावर दर निश्चित केला जातो.
  6. सुंगधी अर्क किंवा द्रव्य यासाठी गुलाब, निशिगंध, जाई, जुई, मोगरा, केवडा, चंपा आदी सुंगधी फुलांची मागणी वाढत आहे. त्याचा लाभ घेता येईल.