फेसबुकचे मार्केट रिसर्चसाठी नवीन ॲप

    दिनांक :12-Jun-2019
- माहिती शेअर करणार्‍यांना मिळणार पैसे 

 
नवी दिल्ली,
फेसबुकने मार्केट रिसर्चसाठी एक नवीन ॲप नुकतेच लॉन्च केले आहे. या ॲपद्वारे फेसबुककडून एखादा युझर मोबाईलमध्ये कोणते ॲप वापरतो याची माहिती गोळा केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही माहिती शेअर करण्यासाठी फेसबुक पैसे देणार आहे.
 
स्पर्धेत टिकण्यासाठी सध्या ऑनलाईन विश्वातील प्रत्येक कंपनी युझर्सला नवीन नवीन गोष्टी देण्याचा प्रयत्न करीत आहे. फेसबुकही मार्केट रिसर्च करून लोकांना नवीन काय देता येईल याबाबत माहिती घेत असते. यासाठी फेसबुककडून यापूर्वी दोन ॲप लॉन्च करण्यात आले होते. मोबाईल युझर्स त्यांच्या फोनवर काय काय करतात याची माहिती मिळवण्याचे काम हे दोन ॲप करीत होते. परंतु, त्यामुळे युझर्सच्या प्रायव्हसीला धोका असल्याची या ॲपवर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर ते बंद करण्यात आले.
 
फेसबुककडून आता नव्याने यासाठी ‘स्टडी’ नावाचे एक ॲप लॉन्च करण्यात आले आहे. हे ॲप सुरुवातीला केवळ ‘प्ले स्टोअर’वर उपलब्ध असणार आहे. हे नवीन ॲप तुमच्या फोनमध्ये तुम्ही कोणकोणते ॲप्स वापरता, किती वेळेसाठी वापरता, कोणत्या फिचर्सचा वापर करता याची माहिती गोळा करेल. यामुळे फेसबुकला इतर कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठीची माहिती मिळवता येणार आहे.
 
या ॲपद्वारे कोणतेही पासवर्ड किंवा अकाउंटची माहिती गोळा करण्यात येणार नाही, असे फेसबुककडून सांगण्यात येत आहे. तुमच्या फोनमधील फोटोज किंवा इतर संवेदनशील माहिती देखील ते ॲप जमा करणार नाही. या ॲपबाबतही काही तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या ॲपमुळे प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. हे ॲप नेमकी काय माहिती पाठवणार आहे, याची युझर्सला कल्पना नसणार, त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ‘या ॲपद्वारे लोकांना जाहिराती दाखवण्यात येणार नाहीत. तसेच ॲपद्वारे जमा केली जाणारी माहिती इतर कंपन्यांना देण्यात येणार नाही,’ असेही फेसबुककडून सांगण्यात येत आहे. सुरुवातीला हे ॲप भारतात आणि अमेरिकेत लॉन्च करण्यात येणार आहे. या ॲपद्वारे लोकांना नेमके किती पैसे देण्यात येतील, त्याबद्दल कोणतीही सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.