शेतकरीपुत्राची कमाल...! बनविली शेण उचलण्याची मशीन

    दिनांक :12-Jun-2019
एक पाऊल स्वच्छतेकडे; स्टार्टअप इंडियाची मान्यता 
 
 
तभा ऑनलाईन टीम  
अमरावती, 
गावात वडिलांचे वय झालेले नि घरी शेतीचे काम भरपूर. शेतीतील जनावरांची स्वच्छता पण तितकीच महत्वाची. पण वडील तरी ही अवजड कामे किती दिवस करणार. आजच्या काळात या कामांना पूर्वीप्रमाणे सालकरी मिळणे पण दुरपास्त. याच समस्येतून नुकत्याच अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या शेतकरी पुत्राने संशोधन केले आणि याच समस्येवर शेण उचलण्याची मशीनची निर्मिती करून आपल्या आई-वडिलांसह अनेक शेतकर्‍याचे भविष्यातील परिश्रम वाचवले.
 

 
 
अमरावती येथील प्रोफेसर राम मेघे इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल शाखेतुन प्रज्वल चव्हाण याने अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केले. परंतु शिक्षण सुरू असतानाच व घरचा मुख्य धंदा शेती असल्यामुळे शेण उचलण्याची मशीन आपण बनवावी असा निर्धार त्याने केला होता. सतत अनेक वर्षे प्रज्वलने यावर शोध केले. मध्यंतरी त्याला या संशोधना दरम्यान अपघात झाला होता. मात्र अपघाताला न घाबरता प्रज्वलने आपले संशोधन सुरूच ठेवले आणि यातूनच मशीनची निर्मिती केली.
 
ही मशीन ई बाईक प्रमाणे मोटर वर आधारित असून एका सेकंदात ती शेणाचा पोहटा उचलू शकते. अशामुळे शेण उचलण्यासाठी हाताची आवश्यकता पडणार नाही. त्यामुळे आता शेण उचलणे अगदी सोपे झाले असुन सेमी ऑटोमॅटिक शेण उचलण्याच्या मशीनचे फक्त बटण दाबल्यास सेकंदात शेण गोळा करते. तसेच शेण उचलणे, साठवणे, फेकणे तेही हात न भरवता ही या मशीनमुळे शक्य झाले आहे. त्याला स्टार्टअप इंडिया मान्यता सुध्दा मिळाली आहे. केवळ 24 वर्षीय मराठमोळ्या विद्यार्थ्याने चक्क स्वत: मशीन बनविल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या ह्या मशीनची विविध ठिकाणी पडताळणी घेण्यात आली असून त्यामुळे सर्वत्र तिची मागणी वाढलेली आहे.
 
याकरिता प्रज्वलने पेटंट पण दाखल केले असून पुण्यातील एका नामांकित कंपनीसोबत प्रज्वल याची निर्मिती करणार आहे. विशेष म्हणजे ही मशीन अतिशय अल्प खर्चात उपलब्ध होणार असून ही मशीन लवकरच सर्वसामान्य शेतकरी, डेअरी व्यवसाय, गोशाला, प्राणी संग्रहालय व जिथे जास्त प्राणी आहे अशा सर्वांसाठी वरदान ठरणार आहे.