देशात प्रथमच हव्याप्र महाविद्यालयात ‘स्पोर्ट इंजिनिअरींग’

    दिनांक :12-Jun-2019
- अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचा निर्णय 

 
अमरावती,
उच्च तंत्र शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांच्या परिश्रमाला तोड नाही पण सतत संगणक, मोबाईल तसेच शैक्षणिक प्रकल्पातून विद्यार्थ्यांच्या शाररीक व मानसिक आरोग्याकडे अनपेक्षीत दुर्लक्ष होत आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी आता देशातील उच्च तंत्र शिक्षणाला संचालित करणारी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) आता प्रत्येक उच्च व तंत्र शिक्षणातील अभ्यासक्रमामध्ये स्पोर्ट इंजिनिअरींग हा स्वतंत्र व नवा विषय जोडण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थांना निरोगी आरोग्य व क्रीडा क्षेत्रात आपल्या तंत्र कौशल्याद्वारे नव्याने उज्वल भवितव्य घडविण्याची संधी लाभणार आहे.
 
आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेत क्रीडा विषयाला महत्व दिले आहे. प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये क्रीडा विषयाचा समावेश करण्यात आला आहे. अशीच तरतूद उच्च व तंत्र शिक्षणामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानुसार अभियांत्रिकी, आर्कीटेक्चर, एम.बी.ए, हॉटेल मॅनेजमेंट, पदविका, पदवी आणि पदव्युत्त अभ्यासक्रमामध्ये क्रीडा विषय व प्रशिक्षण म्हणून स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली आहे. क्रीडा विषयाची तरतूद असली तरी या अवलंब उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात नाममात्र असल्याने याचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांवर होत असल्याचे गांभीर्य अ.भा उच्च तंत्र शिक्षण परिषदेने स्विकारले. यावर एक सक्षम उपाय योजना म्हणून एआयसीटीईच्यावतीने देशभरातील उच्च तंत्र शिक्षण महाविद्यालयांचे मत जाणून घेण्याचे व त्यावर सक्षम अशी उपाय योजना साकारण्यासाठी प्रस्ताव मागितले होते.
 
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्यावतीने एक प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हव्याप्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. श्रीकांत चेंडके, प्राचार्य डॉ. अनंत मराठे व मंडळाच्या शारीरीक शिक्षण महाविद्यालयाचे श्रीनिवास यांनी दिल्ली येथे एआयसीटीईच्या मुख्य कार्यालयात उच्च तंत्र शिक्षण अभ्यासक्रमाला एक आदर्श अशी क्रीडा अभ्यासक्रमाचा प्रस्ताव यशस्वीरित्या सादर केला. यावेळी एआयसीटीई कडे देशभरातील इतरही महाविद्यालयांकडून प्रस्ताव सादर करण्यात आले होते. मात्र श्री हनुमान व्यायाम प्रसाकर मंडळाच्या प्रस्तावातील मुलभूत क्रीडा अनुभवी नियोजनाचे महत्व लक्षात घेत अखिल भारतीय उच्च तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) ने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. 

  
एआयसीटीईचा पुढाकार व श्री हनुमान व्यायाम प्रसाकर मंडळाचे अचुक नियोजन व मार्गदर्शनामुळे आता उच्च व तंत्र शिक्षण अभ्यासक्रमाला अद्ययावत क्रीडा विषयाची जोड मिळणार आहे. ज्यामुळे उच्च शिक्षणातील शिक्षक व विद्यार्थी यांच्या समन्वयातून निरोगी आरोग्य व उज्वल भवितव्याची दालन मिळणार आहे. राष्ट्रीयस्तरावर श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड होणे ही खरोखर अमरावतीकरांसाठी गौरवास्पद बाब ठरली आहे. या निमीत्त्याने समस्त शैक्षणिक क्षेत्रातुन आणि अमरावतीकरांच्यावतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
 
१९ ऑगस्ट रोजी मंडळात उद्घाटन सोहळा
श्री हनुमान व्यायाम प्रसाकर मंडळाने अ.भा उच्च तंत्र शिक्षण परिषदेच्या बैठकीत यशस्वीरित्या सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता देत एआयसीटीई आता या नाविन्यपुर्ण उपक्रम पायलट प्रोजेक्ट म्हणुन राबविणार आहे. याकरीता श्री हनुमान व्यायाम प्रसाकर मंडळाद्वारे संचालित अभियांत्रिकी महाविद्यालयाची देशात प्रथमच निवड करण्यात आली आहे. आता या प्रकल्पाला मुर्त स्वरूप देण्याकरीता एआयसीटीईच्यावतीने 19 ऑगस्ट रोजी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्घे, सल्लागार डॉ. डी.एन मालखेडे, मानव विकास संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यासह अनेक ख्यातनाम तज्ञ उपस्थित राहणार आहेत.