हॉंगकॉंगमध्ये निदर्शकांचा संसदेत घुसण्याचा प्रयत्न

    दिनांक :12-Jun-2019
हाँगकाँग ,
हत्या आणि बलात्काराच्या गुन्हेगारांना चीनच्या स्वाधीन करण्याबाबतच्या प्रस्तावित कायद्याचा निषेध करण्यासाठी हाँगकाँगमध्ये तीव्र निदर्शने सुरूच आहेत. बुधवारी हजारोंच्या संख्येतील निदर्शकांनी हाँगकाँगच्या संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. निदर्शकांना पांगवण्यासाठी अश्रुधूराचा उपयोग करण्यात आला. 

 
 
2014मधील  क्रांतीनंतर प्रथमच येथे मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यांवर उतरले आहेत. येथील लोकसंख्या सुमारे 74 लाख आहे. प्रस्तावित कायद्यातील दुरुस्ती ही हाँगकाँगसाठी धोकादायक असून, प्रस्तावित दुरुस्ती विधेयकामुळे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात हाँगकाँगची प्रतिष्ठा मलीन होईल. न्यायव्यवस्थाही कोलमडून पडेल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
 
दरम्यान, आजच्या आंदोलनामध्ये व्यावसायिक, वकील, विद्यार्थी, गृहिणी आणि विविध धार्मिक गटांचे सदस्य सहभागी होते. तरुणांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यांनी पोलिसांच्या दिशेने हाती मिळेल त्या वस्तू फेकण्यास सुरुवात केली होती.
 
 
 
गुन्हेगारांना चीनच्या स्वाधीन करायचे की नाही, याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार न्यायालयालाच असणार आहे, अशी हमी हाँगकाँग सरकारने दिली असून, राजकीय आणि धार्मिक गुन्ह्यातील गुन्हेगारांचे प्रत्यार्पण करण्यात येणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले. नागरिकांचे मात्र, त्यावर समाधान झालेले नाही. हा कायदा पारित झाल्यानंतर हॉंगकॉंगला, तायवान आणि मकाऊ येथील गुन्हेगारांनाही चीनच्या स्वाधीन करणे भाग पडणार आहे. तायवानचे चीनसोबत अतिशय तणावाचे संबंध आहेत, हे येथे उल्लेखनीय.
 
विद्यमान कायद्यानुसार, हत्या आणि बलात्काराच्या घटनेतील गुन्हेगारांना लपण्यासाठी हाँगकाँगचा वापर करता येतो, पण या कायद्यात दुरुस्ती झाल्यानंतर गुन्हेगारांच्या पलायनाचे सर्व मार्ग बंद होणार आहेत. दरम्यान, हाँगकाँगचे मुख्य सचिव मॅथ्यू च्युअँग यांनी नागरिकांना निदर्शनात भाग न घेण्याचे आवाहन केले. मात्र, नागरिकांनी हे आवाहन धुडकावून लावले.